"माझा भाऊ पायाला भिंगरी लावून फिरतोय, त्याचं वाईट वाटतं. मी घरी कशी बसू? कोल्हापूरमध्ये आमचे सगळे उमेदवार निवडून येणार... मला फक्त हसन मुश्रीफ यांना पाडाचंय," असे विधान शरद पवार यांच्या ज्येष्ठ भगिनी सरोज पाटील यांनी आज बारामतीत केले.
“भाजप सोडून कुणालाही मतदान करा. हे नालायक लोकं आहेत,” असे सांगत शरद पवार यांच्या भगिनी आणि एनडी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी बारामतीची सभा गाजवली. भर सभेत त्यांनी "हसन मुश्रीफांना पाडायचं" असे थेट आवाहन केले. सभेला प्रतिभाताई पवार, माजी आमदार लक्ष्मण माने उपस्थित होते. "लोकशाही टिकवा, भाजपला चिरडून टाका”, असे सरोज पाटील म्हणाल्या.
सरोज पाटील म्हणाल्या, "माझ्यापेक्षा शरद पवार हा लहान आहे. त्याची तब्येत बरी नसते. तरी तो एवढा फिरतो, आपण घरी कसं बसायचं, माझ्यातही ताकद नाही. मी पण कोल्हापुरात फिरते. मला खात्री आहे की, कोल्हापूरमध्ये जयंत पाटील, विश्वजीत कदम, समरजीत घाटगे यांच्यासह सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील. मला फक्त हसन मुश्रीफांना पाडायचे आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत,"
माझा महाराष्ट्र कसा होता आणि आज काय परिस्थिती झाली आहे. यामुळे मला रात्रभर झोप येत नाही. भाजपची ही विषवल्ली मुळासकट उपटली पाहिजे. सध्या महाराष्ट्र हा अंधारात चाचपडत आहे. प्रतिगामी शक्ती डोकेवर काढत आहेत, हे पाहून अतिशय वेदना होतात, अशी खंत सरोज पाटील यांनी व्यक्त केली. डॉ. विश्वंभर चौधरी, अॅड. असीम सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सरोज पाटील बोलत होत्या.
सरोज पाटलांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. "आमची आई म्हणायची जे समाजाचा संसार करतात त्याचा संसार समाजानं करायचा असतो. शरद पवार आणि एन डी पाटील राजकारणाचा जोडे बाजूला ठेवायचे आणि घरात यायचे. आमच्या आई वडिलांना सगळ्यात लाडका जावई एनडी होते. फाटका जावई लाडका होता,'
सभेसाठी सरोज पाटील जेव्हा व्यासपीठावर आल्या, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, प्रतिभाताई पवार या व्यासपीठावर आल्या नाहीत. तेव्हा सरोज पाटलांनी थेट माईकचा ताबा घेतला अन् " माझ्या भावजय माझ्याबरोबर आल्या आहेत, परंतु त्या खाली बसलेल्या आहेत, तेव्हा आता तुम्हाला मोठ्या नणंदेचा आदेश आहे, तुम्ही वरती या," असे सांगितले. त्यानंतर प्रतिभाताई पवार या व्यासपीठावर आल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.