समाजवादी मंडळींच्या आठवणी, तसेच किस्से खूपच आहेत. बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असताना पहिली दीड वर्षे, (एमबीबीएसचे पहिले सत्र) एक मानवी शरीर डिसेक्ट करावे लागते. म्हणजे चार-सहा विद्यार्थ्यांमध्ये मिळून एक मृत शरीर दिले जाते. रोज तीन तास पुस्तकानुसार त्या शरीरातील सूक्ष्म रक्तवाहिन्या, नर्व्हज वगैरे पहावे लागते.
रोज तीन तास डिसेक्शन झाल्यावर ते प्रेत फॉमलीन या रसायनाच्या टँकमध्ये ठेवले जाते. त्यातून प्रत्येक वैद्यकीय विद्यार्थ्याला हा विश्वास मिळतो, की जगातल्या सर्व मनुष्य प्राण्याचे शरीर निसर्गाने एकाच पद्धतीने तयार केले आहे. हे ज्ञान झाल्यानंतर डोक्यात अनेक वैचारिक भुंगे घोंगावू लागले. वडिलधाऱ्या माणसांनी डोक्यात प्रत्येक जात वेगवेगळी असते,
स्त्रियांच्या व पुरुषांच्या बुद्धिमत्तेत फरक असतो वगैरे कुसंस्कार केलेले असतात. त्या कुसंस्कारांचा आणि या नवीन साक्षात्कारी ज्ञानाचा डोक्यात संघर्ष चालू झाला. साऱ्या कुसंस्कारातून बुद्धी शुद्ध झाली. म्हणून आम्ही काही विद्यार्थी समाजवादी विचारांचे झालो. त्यावेळी पुण्यात प्रजा समाजवादी पक्ष (प्रसोपा) व संयुक्त समाजवादी पक्ष (संसोपा) असे दोन समाजवादी पक्ष आणि त्यांची दोन स्वतंत्र कार्यालये होती.
रोज सायंकाळी कॉलेज संपल्यावर मी आणि अनिल अवचट सायकलीवरून घरी येताना दोन्ही समाजवादी पक्षांच्या कार्यालयात वेळ घालवायचो. समाजवाद ही अत्यंत तर्कसंगत आणि अखिल मानवतेला लागू असलेली विचारसरणी असली तरी या पक्षांच्या हातून भारतात समाजवादी समाजरचना अवतरेल याबद्दल काही आशा दिसेना. त्यामुळे दोन्ही कार्यालयांत मन रमेना.
समाजवादी चळवळीचे वैशिष्ट्य हे होते, की त्यांचे नेते एकत्र असताना सतत फुटण्याचा विचार करीत. एकमेकांपासून फुटून स्वतंत्र पक्ष निर्माण झाल्यावर तो चालत नाही हे त्यांच्या लक्षात येत असे. मग ते आरोळी द्यायचे...‘आपण सर्व गटांनी एकत्र आले पाहिजे.’
१९६४ साली या आरोळीला सर्वांचा प्रतिसाद मिळाला. सर्व गट एकत्र आले. नवे नाव ठरले ‘संयुक्त समाजवादी पक्ष!’ हे संमेलन वाराणसीला होणार होते. संमेलनाच्या आधी देशभर चर्चेला उधाण आले. वाराणसीला दोन प्रमुख पक्षांची सप्तपदी होणार आणि पुढील सात जन्म एकत्र राहण्याचे ते एकमेकांना वचन देणार हे सर्व पूर्वनिश्चित होते. परंतु ऐन मंडपात सप्तपदी घालताना त्यांनी लठ्ठालठ्ठी केली आणि ते पुन्हा अलग झाले. या घटनेचा समाजवादी दिक्षा घेऊ इच्छिणाऱ्या आमच्यासारख्या तरुणांवर खोलवर परिणाम झाला.
या घटनेत एक गमतीचा प्रसंग होता. प्रजा समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते नानासाहेब गोरे. दुसऱ्या समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. एस. एम. जोशी (अण्णा) हे दोन थोर नेते पुण्यात एकाच रस्त्यावरील घरात राहात. मिलनाच्या प्रसंगी झालेल्या घटस्फोटाचा परिणाम असा झाला, की एस. एम. जोशी म्हणाले, ‘‘आता मी या फुटीला कंटाळलो आहे. मी घटस्फोट घ्यायला तयार नाही. मी नव्या ‘संसोपा’च्या राष्ट्रीय अध्यक्ष या पदावर राहीन.’’ घटस्फोटानंतर जे पुन्हा प्रजा समाजवादी पक्षात गेले त्यात होते बॅ. नाथ पै, मधू दंडवते, नानासाहेब गोरे वगैरे. प्रजा समाजवादी पक्षाचे जुने नेते व अध्यक्ष एस. एम. जोशी मात्र नव्या पक्षात राहिले. त्यामुळे नानासाहेब गोरे प्रजा समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले.
पुण्यात ‘काकाकुवा मेन्शन’ हे समाजवाद्यांचे प्रारंभापासूनचे कार्यालय. पुण्यात भाई वैद्य, बाबा आढाव वगैरे नेते एस. एम. जोशींना मानणारे. एकूणच ‘संसोपा’चे सभासद पुण्यात जास्त संख्येने होते. सगळे जण ‘काकाकुवा मेन्शन’च्या कार्यालयात गेले. प्रा. ग. प्र. प्रधान हे सर्व समाजवाद्यांचे आवडते. ते मात्र नानासाहेब गोरे यांचे नेतृत्व मानणारे. ते आणि लालजी कुलकर्णी हे काठ्या घेऊन ‘काकाकुवा मेन्शन’मधील जुने ऑफिस ताब्यात ठेवण्यासाठी दरवाजात उभे राहिले. प्रधान सरांच्या अंगावर लाठी चालवायची कुणाची हिंमत झाली नाही. म्हणून ते कार्यालय प्रजा समाजवादी पक्षाचे राहिले.
कालांतराने ‘संसोपा’वाल्यांनी पासोड्या विठोबाजवळ आपले नवीन कार्यालय थाटले. गर्दी मात्र ‘संसोपा’चा छोट्या ऑफिसमध्ये अधिक असायची. ‘काकाकुवा मेन्शन’मधील भव्य कार्यालयात फारसे कुणी फिरकत नसे. समाजवादी मंडळी तेजस्वी-त्यागी होती, पण त्यांच्याकडे स्वतःची म्हणता येईल अशी वेगळी वैचारिक मांडणी नव्हती. ते महात्मा गांधींना मानत. पण म्हणत की आम्हाला गांधींची अहिंसा पूर्णपणे मान्य नाही. हिंसक क्रांतीही मान्य नाही. आम्हाला वर्गलढा मान्य आहे. गांधींना तो मान्य नाही. म्हणून आम्ही गांधी अर्धा मानतो आणि मार्क्स अर्धा मानतो.
१९३४ साली काँग्रेसच्या पोटात ‘काँग्रेस सोशालिस्ट पार्टी’ नावाचे बाळ वाढत होते. त्यांच्या मनात काँग्रेसची संघटना आणि आपले क्रांतिकारी विचार असे हायब्रीड तयार करायचे होते. ते तरुण काँग्रेसच्या अधिवेशनात धुवांधार भाषणे करीत. पं. जवाहरलाल नेहरू व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देत. काँग्रेसमधील आर्य समाज व हिंदुराष्ट्रवादी नेत्यांच्या विरोधात बोलत. सगळ्यांचा राग ओढवून घेत. तरी काँग्रेसने त्या नेत्यांना कांगारूप्रमाणे पोटाशी धरले होते. महात्मा गांधींचा त्यांच्यावर वरदहस्त होता. त्यांचे तत्कालीन नेते डॉ. राममनोहर लोहिया गांधींना आपला पिता मानत.
समाजवादी नसलेले काँग्रेसचे पुढारी समाजवाद्यांना ‘गांधींची लाडावलेली लेकरे’ म्हणत. १९४६मध्ये मात्र सरदार पटेलांनी जयप्रकाशजींना सांगितले की ‘पक्षात राहायचे असेल तर तुम्हाला शिस्त पाळावी लागेल; नाहीतर बिहारमध्ये तुमची शक्ती आहे तिथे तुम्ही राज्य सरकार स्थापन करा. जो समाजवादी कार्यक्रम अमलात आणायचा आहे, त्याला काँग्रेसची परवानगी आहे. हे मान्य नसेल तर पक्षातून बाहेर पडा आणि स्वतंत्र समाजवादी पक्ष काढा.’ समाजवाद्यांना बाहेर पडावे लागले. स्वतंत्र पक्ष स्थापन करावा लागला.
संविधान सभेत समाजवादी सहभागी झाले नव्हते. त्यास काँग्रेसने टाळले होते हे खरे नाही. संविधान सभेत कोणत्या समाजवादी नेत्यांनी यावे, याबद्दल समाजवाद्यांमध्येच तीव्र मतभेद होते. म्हणून त्यांनी संविधान निर्मितीवर बहिष्कार टाकला होता. १९४२च्या भूमिगत लढ्यात त्यांनी दाखवलेले तेज त्यांना त्या पिढीच्या अस्तापर्यंत पुण्याई म्हणून पुरले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.