Karandi bullock cart race News: करंदी (ता. शिरूर): करंदी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेली बैलगाडा शर्यत एका तरुणाच्या जीवावर बेतली. धावत्या बैलाला आवरण्याच्या प्रयत्नात बैलाच्या जबर धडकेत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे शर्यतीच्या आयोजनावर आणि सुरक्षेच्या प्रश्नांवर गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
काल (ता. ३०) ‘करंदी केसरी २०२६’ बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यत सुरू असताना कान्हूर मेसाई येथील दादाभाऊ पुंडे यांचा बैलगाडा अचानक अनियंत्रित झाला. यावेळी बैलांना पकडण्यासाठी प्रकाश महादू फटांगडे (वय ३५, रा. कान्हूर मेसाई) पुढे सरसावले. मात्र, संतप्त आणि वेगात धावणाऱ्या बैलाने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत ते गंभीर जखमी होऊन खाली कोसळले.
घटनेनंतर उपस्थितांनी तत्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी मृताचा भाऊ गोरक्ष फटांगडे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार नरेंद्र गायकवाड करत आहेत.
या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी आयोजकांवर गंभीर आरोप केले आहेत. गावात कोणतीही यात्रा नसताना केवळ निवडणुकीच्या प्रचारासाठी शर्यत भरवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शर्यतीच्या ठिकाणी रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक किंवा पुरेसा पोलिस बंदोबस्त नसल्यानेच हा जीवघेणा प्रकार घडल्याचा संताप व्यक्त होत आहे.
नातेवाईकांनी आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी संपूर्ण चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी दिली. आता या घटनेतून आयोजकांवर गुन्हा दाखल होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.