Karmayogi Sugar Factory Election, Harshvardhan Patil Sarkarnama
पुणे

Harshvardhan Patil Chairman : कर्मयोगी कारखान्याच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील; पद मिळताच केली मोठी घोषणा

Karmayogi Sugar Factory Election, Harshvardhan Patil news : बॉयलर दुरुस्तीसाठी तब्बल अठरा कोटी रुपये खर्च करण्यात आला असून, आता कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.

Sudesh Mitkar

Pune News : आर्थिक अडचणीत असलेल्या कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक राजकीय सामंजस्यातून बिनविरोध पार पडली. कारखान्यावरील आर्थिक भार वाढू नये आणि निवडणुकीचा अनावश्यक खर्च टाळावा, यासाठी तालुक्यातील राजकीय पक्ष, शेतकरी संघटना आणि प्रमुख नेत्यांनी एकत्रित भूमिका घेतली. त्यानंतर नवनिर्वाचित संचालक मंडळाने हर्षवर्धन पाटील यांची अध्यक्षपदी, तर छगनराव भोंगळे यांची उपाध्यक्षपदी निवड केली.

निवडणुकीनंतर कारखान्याच्या आगामी वाटचालीबाबत भूमिका स्पष्ट करताना हर्षवर्धन पाटील यांनी पक्षीय राजकारण, गट-तट बाजूला ठेवून शेतकरी, कामगार आणि सहकार चळवळीच्या आर्थिक उन्नतीला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. कारखान्याच्या अडचणीच्या काळात निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.

कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ८४ गावांतील सुमारे साडेपंधरा हजार शेतकरी आणि बाराशे ते तेराशे कामगारांच्या हिताचा विचार करून अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी दाखल न करण्याचा, तर काहींनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. या सामंजस्यामुळे निवडणुकीचा खर्च आणि राजकीय संघर्ष टाळता आला, असे पाटील यांनी स्पष्ट केले. कारखान्याच्या उभारणीमध्ये योगदान दिलेल्या जुन्या सहकाऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान राखण्याच्या भूमिकेतून संचालक मंडळाने नेतृत्वाची निवड केल्याचेही त्यांनी सांगितले.

सहयोगी संस्थेच्या कारभारावर संचालक मंडळाचे नियंत्रण

कारखान्याच्या सहयोगी तत्त्वावरील पंधरा वर्षांच्या कराराचे एक वर्ष पूर्ण झाले असून दुसरे वर्ष सुरू आहे. या कराराला राज्य शासनाची मान्यता मिळाल्याचे पाटील यांनी सांगितले. करारानुसार सहयोगी संस्थेचा महाव्यवस्थापक प्रत्येक संचालक मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार असून मासिक कामकाजाचा अहवाल सादर करणार आहे. नवीन गुंतवणूक, अधिकारी नियुक्ती आणि कामगार भरती यांसारखे महत्त्वाचे निर्णय संचालक मंडळाच्या संमतीने घेतले जाणार आहेत. सहयोगी संस्थेकडून दहा कोटी रुपयांची बँक हमी देण्याची तरतूदही करारात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बॉयलर दुरुस्तीवर १८ कोटी; पूर्ण क्षमतेने गाळपाचा दावा

मागील हंगामात कर्मयोगी कारखान्याने साडेसात लाख टन उसाचे गाळप केले. शेतकऱ्यांना प्रतिटन तीन हजार दोनशे रुपये दर देण्यात आला असून उर्वरित दीडशे रुपये येत्या दोन दिवसांत अदा करण्यात येणार असल्याची घोषणा हर्षवर्धन पाटील यांनी केली. यंदा दिवाळी, कामगारांचे प्रश्न आणि चारही बॉयलरच्या तपासणी व दुरुस्तीमुळे कारखाना सुरू होण्यास सुमारे पंधरा दिवस विलंब झाला.

बॉयलर दुरुस्तीसाठी तब्बल अठरा कोटी रुपये खर्च करण्यात आला असून, आता कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस कर्मयोगी कारखान्याला द्यावा, असे आवाहन करत आगामी काळात कारखान्याची आर्थिक स्थिती सुधारून शेतकरी आणि कामगारांचे हित जपण्याला प्राधान्य दिले जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT