Ajit Pawar and congress
Ajit Pawar and congress Sarkarnama
पुणे

Pune : कसबा मतदारसंघ : अजित पवारांच्या भीतीमुळे कॉंग्रेसकडून अवघ्या चोवीस तासात इच्छुकांची यादी जाहीर

सरकारनामा ब्यूरो

Politics : कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर होत चालली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडून या जागेवर दावा सांगण्याची शक्यता निर्माण झाल्याने कॉंग्रेसने इच्छुकांची यादी तातडीने जाहीर केली. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता दिसत नाही. या मतदारसंघात आम आदमी पक्षाच्यावतीने देखील उमेदवार येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

ज्याची जास्त ताकद त्यांना जागा देण्याचा विचार करण्यात यावा, अशी भूमिका मांडत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शनिवारी प्रत्यक्षरित्या दावा सांगितल्यानंतर कॉंग्रेसने कसब्यासाठी आज तातडीने पाच संभाव्य इच्छुकांची यादी प्रदेश कॉंग्रेसकडे पाठविली.

त्यामुळे राष्ट्रवादीने दावा सांगण्याआधीच कॉंग्रेस ‘ॲक्टीव्ह’ झाली असून पाचपैकी कुणालाही उमेदवारी मिळाली तरी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी चर्चा केल्यानंतर येत्या काही दिवसात उमेदवारी जाहीर होणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

या निवडणुकीसाठी प्रदेश कॉंग्रेसने भोरचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांना निरीक्षक नेमले आहे. आमदार थोपटे यांच्याकडे या पाच इच्छुकांची यादी सोपविण्यात आली आहे. ही यादी प्रदेश कॉंग्रेसकडे पाठविण्यात येणार असून त्यावर लवकरच निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडीत चिंचवडची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे तर कसब्याची जाता कॉंग्रेसकडे आहे.

या दोन्ही ठिकाणी निवडणूक लढण्याची तयारी दोन्ही पक्षांनी सुरू केली आहे. तरीही कसब्याच्या जागेवर अजित पवार यांचा डोळा असल्याचे त्यांच्या शनिवारच्या वक्तव्यावरून दिसत आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसातच राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकारी माजी नगरसेविका रूपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil-Thombre) यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती.

कसब्यात पक्षाचे प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर, संगिता तिवारी, बाळासाहेब धाबेकर व माजी महापौर कमल व्यवहारे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. या पाच इच्छुकांची यादी प्रदेश कॉंग्रेसकडे पाठविण्यात आली आहे. पाच इच्छुकांची यादी असली तरी धंगेकर व अरविंद शिंदे यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

हा मतदारसंघ वरवर भाजपाचा बालेकिल्ला वाटत असला तरी २००९ च्या मतदारसंघ पूनर्रचनेनंतरच्या प्रत्येक निवडणुकीत कॉंग्रेसची मोठी ताकद दिसून आली आहे. विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी या मतदारसंघाचे २५ वर्षे नेतृत्व केले. तरी प्रत्येकवेळी त्यांना संघर्ष करून विविध क्लुप्त्या लढवून जिंकून यावे लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT