Sunil Kamble, Ramesh Bagwe News Sarkarnama
पुणे

Pune News : कसब्याच्या विजयाने रमेश बागवेंच्या आशा पल्लवीत; कँटोन्मेंटमधील गणित बदलणार...?

Congress News : काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे (BJP) उमेदवार हेमंत रासने यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला.

सरकारनामा ब्यूरो

Kasba By-Election : अनेक वर्ष भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या आणि आघाडी सरकारच्या काळातही अभेद्य राहिलेल्या कसबा मतदारसंघातील पोटनिवणुकीत इतिहास घडला आहे. या मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे (BJP) उमेदवार हेमंत रासने यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला.

त्यामुळे कसबा मतदारसंघाच्या शेजारचा मतदारसंघ असलेल्या कँटोन्मेंटवरही याचा परिणाम होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे (Congress) उमेदवार रमेश बागवे यांचा अवघ्या पाच हजार मतांनीच पराभव झाला होता. त्यामुळे कसब्याच्या विजयानंतर या मतदारसंघातही काँग्रेसच्या तसेच रमेश बागवे यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कसब्याच्या विजयामध्ये बागवे यांनीही चांगली मेहनत घेतली. त्यामुळे कसब्याच्या विजयामुळे कँटोन्मेंटमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नक्कीच बळ मिळणार आहे.

त्या मुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्येही याचा परिणाम दिसणार असल्याचे बोलले जात आहे. कँटोन्मेंटमध्ये भाजपचे सुनील कांबळे विजयी झाले होते. त्यांना 52 हजार 160 मते मिळाली होती. तर काँग्रेसचे रमेश बागवे यांना 47 हजार 148 मते मिळाली होती. तर या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे लक्ष्मण आरडे यांना तब्बल 10 हजार २६ मते मिळाली होती. वंचितमुळे या मतदारसंघात काँग्रेसला फटका बसला होता.

आता वंचित बहुजन आघाडीची आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची युती झाली आहे. त्याच बरोबर वंचितला महाविकास आघाडीमध्ये सहभागी करुन घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. महाविकास आघाडीमध्ये वंचित सहभागी झाली तर पुण्यातील राजकीय गणित मोठ्या प्रमाणात बदलू शकते. त्यातच आता शिवसेनेमध्ये फुट पडली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहे. मात्र, ठाकरे गट हा महाविकास आघाडीसोबत आहे. त्यातच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे ठाकरे यांच्यासोबत आहेत.

त्या मुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळणार असल्याचेही दिसत आहे. कसब्याचा विजय हा काँग्रेसला संजीनवी देणारा ठरला आहे. यामुळे पुण्यातील राजकारणावर मोठा प्रभाव पडणार असल्याचे दिसत आहे. मागील निवडणुकीत कँटोन्मेंट मतदारसंघातील अनेक पदाधिकारी भाजपमध्ये गेले होते. त्यातील काही जण आता पुन्हा काँग्रेसमध्ये सहभागी झाले आहेत. त्यावरुन काँग्रेसमध्ये नाराजी नाट्यही रंगले होते. मात्र, कसबा निवडणुकीच्या तोंडावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी बागवे पितापुत्रांची नाराजी दूर करुन त्यांना कसबा निवडणुकीत सक्रीय केले होते.

कसब्यात ज्या प्रकारे एकत्रीत येवून महाविकास आघाडीने निवडणूक लढवली होती. त्याच प्रमाणे पुढील निवडणुकीत आघाडी टिकली तर पुण्यातील अनेक मतदारसंघात भाजपला फटका बसू शकतो. तर कँटोन्मेंट मतदारसंघातही भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT