Katewadi Grampanchayat Sarkarnama
पुणे

Katewadi Grampanchayat 2023: "अजितदादांच्या काटेवाडीत राष्ट्रवादीकडून एका मताला अडीचशे रुपये..."

Katewadi Grampanchayat Elections 2023 : अजित पवार यांना गावातील ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करता आलेली नाही.

Mangesh Mahale

Pune : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडी (ता. बारामती) गावामध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत (अजित पवार गट) जय भवानीमाता पॅनेलकडून पैसे वाटल्याचा आरोप भाजप पुरस्कृत बहुजन ग्रामविकास पॅनेलचे प्रमुख पांडुरंग कचरे यांनी केला आहे.

काटेवाडी गावात भाजपचे कडवे आव्हान असल्यामुळे अजित पवार यांना गावातील ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करता आलेली नाही. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य पांडुरंग कचरे यांनी राष्ट्रवादीच्या श्री जय भवानी माता पॅनेलच्या विरोधात बहुजन ग्रामविकास पॅनेल उभा करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पॅनेलला आव्हान दिले आहे.

"काटेवाडी विकणे आहे..."

"काल रात्री आमचा गाव विकायला निघाला होता, की अशी परिस्थिती होती, एका मताला अडीचशे रुपये वाटण्यात आले. 'आमचा गाव विकणे आहे, एका माणसाची किंमत अडीचशे रुपये आहे,' असा फलक आम्ही काटेवाडीत लावणार आहोत," असे कचरे म्हणाले. "ही निवडणूक जनतेनं हाती घेतली, त्यामुळे आमचा विजय नक्की आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अजितदादांनी आपल्या समर्थकांना समजून सांगायला पाहिजे. माझा रोख अजितदादांवर नसून गावातील त्यांच्या चार नेत्यांवर आहे," असे कचरेंनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्र्यांच्या गावांमध्ये कोणत्याही प्रकारे सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था नाही. काही गाव पुढारी गावाला वेठीस धरून जाणीवपूर्वक बेकायदा काम करीत असल्याचा आरोप कचरे यांनी केला आहे. काम दुसरे करतात, पण श्रेय दुसरेच घेतात. 'नाव मोठं आणि लक्षणं खोटं' अशी येथील परिस्थिती आहे, असे ते म्हणाले.

कचरेंचे आरोप काटेंनी फेटाळले..

अजित पवार यांनी गावामध्ये केलेल्या विकासकामांमुळे जनता आमच्या पाठीशी असल्याचा निर्धार राष्ट्रवादी पुरस्कृत जय भवानी माता पॅनेलचे प्रमुख विद्याधर काटे यांनी केला. अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असून, या ग्रामपंचायतीमध्ये आमचाच झेंडा फडकावला जाईल, असे ते म्हणाले. पांडुरंग कचरे यांनी केलेले आरोप विद्याधर काटे यांनी फेटाळून लावत त्यांच्याकडूनच पैसे वाटले गेले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार व पत्नी सुनीता पवार यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सकाळी साडेसातच्या दरम्यान हजेरी लावली होती. आशा पवार यांनीच येथे प्रथम मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या."दादा मुख्यमंत्री कधी व्हावेत असे आपणास वाटते, असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता माझ्यासमोरच मुलाने मुख्यमंत्री व्हावे असे मला मनापासून वाटते. लोकांचे त्याच्यावर प्रेम आहे, पण बघू काय होते पुढचे काय सांगावे," असेही आशा पवार या वेळी म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT