Keshartai Pawar- Rahul Divekar, Katraj Dairy Election News, Keshartai Pawar News
Keshartai Pawar- Rahul Divekar, Katraj Dairy Election News, Keshartai Pawar News Sarkarnama
पुणे

कात्रज डेअरी : केशरताई पवार ठरल्या पहिल्या महिला अध्यक्षा; राहुल दिवेकर उपाध्यक्ष

भरत पचंगे

शिक्रापूर (जि. पुणे) : पुणे जिल्हा सहकारी दूध संघाच्या (कात्रज डेअरी, Katraj Dairy) पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान शिरूरच्या केशरताई सदाशिवराव पवार यांना मिळाला आहे. उपाध्यक्षपदी दौंडचे राहुल दिवेकर यांना संधी देण्यात आली आहे. केशरताई पवार या महिला मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आल्या आहेत. दूध संघातील गैरकारभारावर बोट ठेवल्याने प्रस्थापित सदस्यांच्या रोषाला त्यांना अनेकदा सामोरे जावे लागले. मात्र, ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विश्वासाला पात्र ठरल्याने पवार यांना अध्यक्षपदाची मोठी संधी मिळाली आहे. (Katraj Dairy: Keshartai Pawar first woman president; Rahul Divekar Vice President)

कात्रज दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी केशरताई पवार यांचा, तर उपाध्यक्षपदासाठी राहुल दिवेकर या दोघांचे अर्ज नियोजित वेळेत दाखल झाले होते. इतरांचे अर्ज न आल्याने अखेर पवार आणि दिवेकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केली. (Katraj Dairy Election News)

अध्यक्ष पवार यांचा २००० मध्ये पहिल्यांदा संचालक म्हणून कात्रज दूध संघात प्रवेश झाला होता. पुढे सलग दोन पंचवार्षिकमध्ये त्या संचालक म्हणून निवडून आल्या हेात्या. मात्र, कौटुंबीक कारणामुळे त्यांनी २०१० मध्ये निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २०१६ मध्ये त्या तिसऱ्यांदा निवडून आल्या. त्यानंतर त्यांना कात्रज दूध संघात पहिल्या महिला उपाध्यक्षा होण्याचा सन्मान पक्षाकडून देण्यात आला होता.

दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी महिला मतदार संघाऐवजी अ वर्ग शिरुर तालुका मतदार संघातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केशरताई पवार यांची या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, काही राजकीय घडामोडींमध्ये पवार यांच्या ऐवजी स्वप्नील ढमढेरे यांना अ वर्ग मतदार संघातून उतरविण्याचा निर्णय पक्षाने घेतला. मतदारसंघ बदल्याने प्रचारासाठी पवार यांच्याकडे केवळ १५ दिवस होते. त्या काळात पवार कुटुंबीयांनी संपूर्ण जिल्ह्यातील एकूण ७०२ मतदारांशी संपर्क साधून त्यातील ५४८ म्हणजेच ७८ टक्के एवढ्या मताधिक्याने विजय मिळविला. मोठे मताधिक्क्य मिळवित त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांनाही सडेतोड उत्तर दिल्याची चर्चा निकालानंतर शिरूर तालुक्यात रंगली होती.

पुणे जिल्हा दूध संघासारख्या मोठे संस्थेवर अध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल केशरताई पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पती सदाशिवराव पवार व दीर प्रकाश पवार यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव देण्याचा प्रयत्न करणार

गेली २० वर्षे कात्रज दूध संघात काम करत असताना भ्रष्टाचाराचा एकही आरोप लागू दिला नाही, त्यामुळेच मतदारांनी चौथ्या वेळी विक्रमी मतांनी विजयी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते, पदाधिकारी यांनी जो माझ्यावर विश्वास दाखविला, त्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे. माझे पती, दीर व संपूर्ण कुटुंबीय यांनी जो माझ्यासाठी त्याग केला, त्याची उतराई मी माझ्या कामाने करून दाखविणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील एकुण दूध संकलन, विक्री, नफा, शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव आणि ग्राहकांचे समाधान यासाठी मी काम करणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT