Shashikant Shinde Sarkarnama
पुणे

Koregaon ZP Election : कोरेगावचा 'गड' पुन्हा राष्ट्रवादीकडे! आमदार शिंदेंच्या होम ग्राऊंडवर 'घड्याळा'चा गजर

Koregaon election result NCP : शिंदे आमदारांच्या होम ग्राऊंडवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दणदणीत विजय. कोरेगावमध्ये ‘घड्याळा’चा गजर. संपूर्ण बातमी वाचा.

Rashmi Mane

पांडुरंग बर्गे

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा गटांपैकी तीन गटांत आणि कोरेगाव पंचायत समितीच्या १२ पैकी नऊ गणांत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय मिळवत तालुक्यावर वर्चस्व सिद्ध केले आहे. या विजयामुळे कोरेगाव पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा पुन्हा एकदा झेंडा फडकणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा हा विजय शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांना धक्का देणारा, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार नितीन पाटील यांना बळ देणारा ठरणार आहे.

कोरेगाव तालुक्यात २०१७ च्या निवडणुकीत एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसने चार गटांत, तर काँग्रेसने एका गटात विजय मिळवला होता, तर पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे सात सदस्य निवडून आल्याने कोरेगाव पंचायत समितीवर एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला होता. पंचायत समितीत काँग्रेसला दोन व शिवसेनेला एक जागा मिळाली होती. आता नऊ वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीसाठी तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक गट वाढून सहा गट झाले होते. त्यामुळे सहा गट व त्या अंतर्गत १२ गणांत शनिवारी चुरशीने निवडणूक झाली.

तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सहापैकी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सातारारोड (सारिका फाळके विजयी) व कुमठे गटात (हणमंतराव जगदाळे विजयी), तर आमदार शशिकांत शिंदे व खासदार नितीन पाटील यांनी वाठार स्टेशन (जयश्री भोसले विजयी) व एकंबे गटात (राजेश्वरी भोसले विजयी) बाजी मारली.

फलटण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक गटात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप व रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अशी लढत झाली. त्यात रणजितसिंह यांनी (अमित चव्हाण विजयी) रामराजेंवर मात केली. कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट वाठार किरोली गटात भाजपचे आमदार मनोज घोरपडे व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उमेदवारांत लढत झाली.

मात्र, या गटातील गटासह (संध्यारजनी भोसले विजयी) गणातील दोन अशा तीनही जागांवर विजय मिळवत माजी मंत्री पाटील यांनी आमदार घोरपडे यांच्यावर मात केली. कोरेगाव पंचायत समितीच्या १२ पैकी सोनके, अंबवडे संमत वाघोली, सातारारोड, कुमठे, ल्हासुर्णे, एकंबे, साप, आर्वी, वाठार किरोली या गणांत राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवत पंचायत समितीवर एकहाती सत्ता मिळवली आहे. पिंपोडे बुद्रुक व किन्हई गणात शिवसेनेच्या दोन व वाठार स्टेशन गणात भाजपच्या एका महिला उमेदवाराने विजय मिळविला आहे. २०१७ च्या निवडणुकीची तुलना केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसने कोरेगाव पंचायत समितीवर सत्ता कायम ठेवली आहे.

सभापतिपदाची संधी ल्हासुर्णे की वाठार कुरोली गणाला

कोरेगाव पंचायत समितीच्या पहिल्या अडीच वर्षांसाठी सभापतिपदाचे आरक्षण नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग महिला राखीव आहे. या प्रवर्गासाठी तालुक्यात ल्हासुर्णे व वाठार कुरोली हे दोन गण राखीव होते. या दोन्ही गणांतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुक्रमे रूपाली गुरव व निकिता गिरी या दोन महिला उमेदवार निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे या दोन्हीपैकी एका उमेदवारास सभापतिपदाची लॉटरी लागणार हे निश्चित आहे.

पिंपोडे बुद्रुक व सातारारोडमध्ये काटे की टक्कर!

पंचायत समितीच्या सातारारोड गणात डॉ. संजय आवडे व शहाजी कांबळे यांच्यात चुरशीने लढत झाली. अखेरीस केवळ ७० मतांनी डॉ. आवडे यांना विजय मिळाला. तद्वतच पिंपोडे बुद्रुक गटातही भाजपच्या अमित चव्हाण व शिवसेनेच्या सतीश धुमाळ यांच्यात चुरशीने लढत झाली. मात्र, अखेरीस श्री. चव्हाण यांनी १३९ मतांनी विजय मिळवला.

एकंबेत राजेश्वरी भोसलेंचा विक्रमी मताने विजय

एकंबे गटात एकसळ येथील उद्योजक दयानंद भोसले यांच्या पत्नी राजेश्वरी भोसले व उद्योजक जवाहरलाल ऊर्फ राजेंद्र भोसले यांच्या पत्नी सुनीता भोसले यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दोन्ही उमेदवारांनी निवडणूकपूर्व गटातील हजारो महिला वर्गाला अनेक तीर्थस्थळी मोफत देवदर्शन घडवले होते. त्यामुळे आता या महिला कोणाच्या पदरात आपले मत टाकतात याची मोठी उत्सुकता लागून राहिली होती. अखेरीस या गटातून राजेश्वरी भोसले यांनी तालुक्यात विक्रमी अशा आठ हजार ९७९ अशा मताधिक्याने विजय मिळवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT