Amol Kolhe, Mahesh Landage, Shivajirao Adhalrao patil
Amol Kolhe, Mahesh Landage, Shivajirao Adhalrao patil sarkarnama
पुणे

महेश लांडगेंचे कोल्हे-आढळरावांना आवाहन; उद्धव ठाकरे अन् अजितदादांकडे पाठपुरावा करा!

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेला संरक्षण मंत्रालयाने नुकतीच परवानगी नाकारली. त्यामुळे आता तो खेड तालुक्यात होण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आणि शिवसेना हे प्रमुख पक्ष एकत्र येण्याचे संकेत शनिवारी (ता.८) मिळाले. त्यासाठी भोसरीचे भाजप आमदार आणि पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे (Mahesh Landage) यांनी पक्षीय जोडे बाजूला ठेवून यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करताच त्याला राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी लगेच सकारात्मक प्रतिसाद दिला. कारण त्यांच्याच शिरूर मतदारसंघात हा विमानतळ पुन्हा होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.

डॉ. कोल्हेंच्या जोडीने शिरूरचे माजी खासदार शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव-पाटील यांनाही लांडगे यांनी शुक्रवारी (ता.७) पक्षीय मतभेद बाजूला ठेवून खेडच्या विमानतळासाठी एकत्र येण्याकरिता पत्र लिहिले. त्याला आज (ता.८) डॉ. कोल्हे यांनी उलट पत्राने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी लांडगेंच्या भुमिकेचे स्वागत केले. विकासकामात कोणतेही राजकारण असता कामा नये, अशीच आपली भुमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खेड विमानतळासाठी पुढाकार घेण्याचे मान्य करीत त्यासाठी पाठपुरावाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी प्रस्तावित आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक विमानतळ खेड तालुक्यात व्हावे, यासाठी आपण सर्वांनी पक्षीय मतभेद विसरून प्रयत्न करायला हवेत. प्रस्तावित विमानतळ पुरंदर येथे जाहीर करण्यात आले होते. त्यावेळी खेड तालुक्यात विमानतळ उभारण्यासाठी आपण आग्रही मागणी केली होती. दरम्यान, राज्य सरकारने पुरंदरमध्ये विमानतळाची जागा निश्चित केली. मात्र, केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने राज्य सरकारने निर्धारित केलेल्या जागेला ना हरकत परवानगी दिली नाही. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदारसंघासह पिंपरी-चिंचवडच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने खेड तालुक्यात विमानतळ उभारण्याची संधी पुन्हा निर्माण झाली आहे. त्यासाठी आपण सर्वपक्षीय स्थानिक लोकप्रतिनिधींनी सकारात्मक भूमिकेत राजकीय जोडे बाजूला ठेवून बैलगाडा शर्यत (Bullock cart race) लढ्याप्रमाणे एकत्र येणे अपेक्षीत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठकारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपआपल्या पक्षाचे नेते म्हणून आजी-माजी खासदारांनी पाठपुरावा करावा, असे लांडगे यांनी शिरूरच्या आजी, माजी खासदारांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचा विकास झपाट्याने होत आहे. उद्योगनगरी आणि कामगारनगरी असलेल्या या शहरामध्ये विविध आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. तळवडे आणि हिंजवडी हे दोन मोठे आयटी पार्क, तसेच इंटरनॅशनल ऑटो हब असलेले तळेगाव, चाकण आणि रांजणगाव या औद्योगिक वसाहती पिंपरी-चिंचवडच्या भोवती आहेत. त्यामुळेच पिंपरी-चिंचवडची ओळख संपूर्ण जगभरात आहे. आगामी काळात पिंपरी-चिंचवडच्या वैभवात भर घालायची असेल आणि येथील इंडस्ट्रिअल व रेसिडेन्सिअल कॉरिडॉर विकसित होण्याच्या दृष्टीने पुढाकार घ्यायचा असेल, तर शहरालगत असलेल्या खेड तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारणे गरजेचे आहे, अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिराधित्य सिंधिया यांची भेट लवकरच घेणार आहे. सर्वांच्या सहकार्याने खेड तालुक्यात विमानतळ झाल्यास पिंपरी-चिंचवडसह शिरुर लोकसभा मतदार संघातील औद्योगिक पट्यातील शाश्वत विकासाला मोठी चालना मिळेल, असा दावा लांडगे यांनी यासंदर्भात बोलताना केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT