Pune News: राज्यातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘आयडॉल शिक्षक’ उपक्रमात पुणे जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी जाहीर करण्यात आलेल्या यादीत पुणे जिल्ह्यातील तब्बल ४८७ शिक्षकांची निवड झाली आहे. राज्यातील एकूण ४ हजार ४८४ शिक्षकांमध्ये पुणे जिल्ह्यातील शिक्षकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे अध्यापनातील गुणवत्ता आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या बाबतीत पुणे जिल्ह्याचे योगदान अधोरेखित झाले आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने गुणवत्तापूर्ण अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या वर्षीपासून ‘आयडॉल शिक्षक’ आणि ‘आयडॉल शाळा’ हा उपक्रम सुरू केला. उत्कृष्ट आणि नाविन्यपूर्ण अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची निवड करून त्यांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा उपयोग राज्यातील इतर शिक्षकांना व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
पहिल्या वर्षी म्हणजेच २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात जिल्हास्तरावर प्रत्येकी दहा शिक्षकांची निवड करण्यात आली होती. त्यावेळी राज्यभरातून ४४२ शिक्षकांना आयडॉल शिक्षक म्हणून संधी मिळाली होती. मात्र, दुसऱ्याच वर्षी ही संख्या थेट ४ हजार ४८४ वर पोहोचली आहे. त्यामुळे या उपक्रमाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते.
एससीईआरटीने जाहीर केलेल्या जिल्हानिहाय यादीत पुणे जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. पुण्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील २६०, नाशिकमधील २४५, अहिल्यानगरमधील २३७ आणि सातारा जिल्ह्यातील २२६ शिक्षकांची निवड झाली आहे.
दुसरीकडे गडचिरोलीतील ४९, गोंदियातील ४६, भंडाऱ्यातील ३५, नंदुरबारमधील २५, परभणीतील १७ आणि वाशिममधील अवघ्या १६ शिक्षकांचा या यादीत समावेश आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील शाळांबरोबरच जिल्हा परिषद, महानगरपालिका तसेच अनुदानित शाळांमधील शिक्षकांनाही या उपक्रमात स्थान देण्यात आले आहे.
या शिक्षकांचा सन्मान करण्याबरोबरच त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला करून देण्याचे नियोजन आहे. राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा आणि चर्चासत्रांमध्ये या शिक्षकांना सहभागी करून घेतले जाणार आहे. आवश्यकतेनुसार त्यांची ‘तज्ज्ञ मार्गदर्शक’ म्हणून नियुक्तीही करण्यात येणार आहे.
त्यामुळे वर्गातील प्रभावी अध्यापन पद्धती, शैक्षणिक प्रयोग आणि नाविन्यपूर्ण उपक्रम इतर शिक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. केवळ पुरस्कार किंवा सन्मानापुरता मर्यादित न राहता, राज्यातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आयडॉल शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान, ही यादी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संकेतस्थळानुसार उपलब्ध करून दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.