MahaVikas Aghadi Latest Marathi News Sarkarnama
पुणे

राष्ट्रवादीच जोमात; आघाडी झाली तरच शिवसेना अन् काँग्रेस फायद्यात

आगामी महापालिका निवडणूक पिंपरी-चिंचवडमध्ये आघाडी करून लढण्याचे संकेत राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच दिले आहेत.

उत्तम कुटे

पिंपरी : आगामी महापालिका निवडणूक पिंपरी-चिंचवडमध्ये आघाडी करून लढण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच दिले आहेत. त्यातही शिवसेनेबरोबर त्यासाठी चर्चा करण्यास त्यांनी आपल्या शहराध्यक्षांनाही सांगितले. दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकला चलो रे चा नारा अगोदरच दिलेला आहे. त्यातून आघाडी झाली नाही, तर त्याचा फटका हा शिवसेनेला पिंपरीत बसणार आहे. राजकीय तज्ज्ञांचेही तसेच मत आहे. (Local Body Election Latest Marathi News)

दुसरीकडे आघाडी झाली नाही तरी पिंपरीत महापौर कॉंग्रेसचाच होईल, असा दावा या पक्षाचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी रविवारी 'सरकारनामा'शी बोलताना केला. आघाडीसाठी आम्हीही सकारात्मक आहोत. मात्र, पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील, तो आम्ही पाळू, असे ते प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या एकला चलो रे भुमिकेवर बोलताना म्हणाले. आघाडीचा तिन्ही पक्षांना फायदाच होणार आहे. त्यामुळे महापालिकेत निर्विवाद सत्ता येईल, असे ते म्हणाले. (NCP, Shiv Sena and Congress alliance in PCMC)

नुकतीच मुदत संपलेल्या पालिका सभागृहात कॉंग्रेसचा एकही नगरसेवक नव्हता. त्यांचा आमदार व खासदारही शहरात नाही. त्यामुळे आघाडी झाली, तर त्यांना फायदा होऊ शकतो, अशी सद्यस्थिती आहे. राजकीय जाणकारांचेही तसेच म्हणणे आहे. तर, आघाडी होवो अथवा न होवो दोन टर्म स्वबळावर शहरात सत्तेत भोगलेल्या राष्ट्रवादीची स्थिती मजबूत आहे. ते एकट्याने सत्तेत येऊ शकतात. तशी त्यांची तयारीही आहे. तरी ते आघाडी करण्याच्या मनस्थितीत आहे, हे विशेष.

शहरात शिवसेनेचा खासदार आहे, पण आमदार नाही. नऊ नगरसेवक २०१७ ला निवडून आले होते. दरम्यान,पुलाखालून बरेच पाणी वाहिले आहे. परिणामी आता परिस्थिती वेगळी आहे. एका नगरसेवकाने अगोदरच पक्षाला जय महाराष्ट्र केला असून आणखी काहींची तशी तयारी आहे, अशी चर्चा आहे. त्यात शिवसेना शहरात तेवढी आक्रमक नाही. तीत गटबाजीही आहे. म्हणून आगामी निवडणुकीत गत वेळचे संख्याबळ टिकविण्याचे आव्हान आहे.

नवीन शहरप्रमुख आणि संपर्कप्रमुखांची निवड विश्वासात घेऊन न झाल्याने पक्षात नाराजीची भावना आहे. त्यात नवे शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले विचारात न घेता एकट्याने काम करीत असल्याचा आरोप पक्षातून होत असून त्याचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली गेली आहे. मात्र, भोसले यांनी त्याचा इन्कार केला. तसेच नुकतेच राज्यभर शिवसंपर्क अभियान दणक्यात झाले. पण, पिंपरी-चिंचवडमध्ये ते कधी होऊन गेले ते कळलेही नाही. त्याचा प्रभाव इथे जाणवला नाही, ही चर्चाही चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT