Jejuri Temple Sarkarnama
पुणे

Jejuri Temple Trust : 'येळकोट येळकोट जय मल्हार!' खंडोबा देवस्थान विश्वस्तमंडळावर आता स्थानिकांचं वाढलं 'बळ'

Jejuri Agitation Successful : अकरा जणांच्या विश्वस्तमंडळावर जेजुरीकरांची संख्या सहा

सरकारनामा ब्यूरो

Martand Devsansthan Trustee : जेजुरी खंडोबा मंदिराच्या सात जणांच्या विश्वस्त मंडळात जेजुरीबाहेरील तब्बल पाच जणांची नियुक्ती करण्यात आली. आता धर्मदाय आयुक्तांनी दिलेल्या निर्णयानुसार येथील विश्वस्तसंख्या अकरा होणार आहे. त्यात मंडळात स्थानिकांची संख्या सहा असणार असल्याची माहिती ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली आहे. या निर्णयाचे जेजुरीकरांनी फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत केले.

जेजुरी मंदिर ट्रस्टवर सहधर्मदाय आयुक्तांनी जेजुरीबाहेरील पाच जणांची निवड केली. दरम्यान, या पदावर वर्णी लागण्यासाठी सुमारे साडेतीनशे जेजुरीकरांनी मुलाखती दिल्या होत्या. त्यातील फक्त एका स्थानिकाची तर शेजारील गावातील एकाची अशा दोघांचीच निवड झाली. त्यांना जेजुरीतील रुढी-परंपराबाबत माहिती आहे. मात्र इतर पाच जणांबाबत ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. (Latest Marathi News)

या निवडीविरोधात ग्रामस्थांनी आपला रोष विविध मार्गांनी व्यक्त केला. दरम्यान, आंदोलकांच्या वतीने सहधर्मदाय आयुक्तांकडे सोमवारी (ता. ५) पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. त्यात जास्तीत जास्त स्थानिकांची निवड करण्याचा विचार करण्याबाबत विनंती केली होती. त्यावर बुधवारी (ता. ७) निर्णय झाला. त्यानुसार आता जेजुरी मंदिर ट्रस्टवर सातऐवजी ११ विश्वस्तांचे मंडळ करण्याची सूचना करण्यात आली आहे.

धर्मदाय आयुक्तांनी दिलेल्या निर्णयानुसार, विश्वस्तांना घटनादुरुस्ती करावी लागणार आहे. त्यानंतर जेजुरी विश्वस्तांची संख्या ११ होणार आहे. वाढलेले चार विश्वस्त जेजुरीतील असतील. या वाढलेल्या चार विश्वस्तांसह सध्याचे दोन असे ११ जणांच्या मंडळात एकूण सहा स्थानिक विश्वस्तांचा समावेश असणार आहे. यामुळे विश्वस्तमंडळात स्थानिकांचे संख्याबळ वाढणार आहे.

विश्वस्तांची संख्या वाढवण्याचे आदेश दिल्याने जेजुरीकरांना न्याय मिळाला आहे. या आदेशानुसार आता जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तमंडळावर जास्तीत जास्त स्थानिकांना संधी मिळणार आहे. त्यामुळे देवसंस्थानचा कारभार करताना येणाऱ्या अडचणींवर तात्काळ निर्णय घेता येतील. तसेच भाविकांच्या भावनांचाही आदर राखला जाणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे जेजुरीकरांनी स्वागत केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT