Lohagad murder case Bride Allegedly Killed Fiancé Ketan Agrawal With Lover’s Help Sarkarnama
पुणे

Lohagad Murder Case: महाबळेश्वरला वाढदिवस, पण त्या आधीच होणाऱ्या नवऱ्याला बॉयफ्रेंडच्या मदतीनं संपवलं! दोघांना अटक

Bride Allegedly Killed Fiancé Ketan Agrawal With Lover’s Help: लोहगड येथे केतन अग्रवाल यांच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिस तपासात होणारी पत्नी सिया गोयल आणि तिच्या प्रियकराने मिळून हत्या केल्याचे उघड झाले आहे

सरकारनामा ब्यूरो

विजय सुराणा

Pune Crime News: लोहगड येथे तरुण उद्योजक केतन अग्रवाल यांच्या मृत्यूप्रकरणी आता धक्कादायक आणि थरारक माहिती समोर येत आहे. सुरुवातीला हा अपघात असल्याचं चित्र निर्माण करण्यात आलं होतं. मात्र पोलिसांच्या सखोल तपासात हा अपघात नसून नियोजित कटातून करण्यात आलेली हत्या असल्याचं उघड झालं आहे.

पोलिस चौकशीत सियाने प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने केतनचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली. या कबुलीजबाबामुळे अपघाती मृत्यूचे गूढ उकलले.

केतन विशाल अग्रवाल (वय २५, रा. लोहा बेलमोंटी टॉवर, गहुंजे, ता. मावळ) यांचा विवाह सिया प्रविण गोयल (वय २०, रा. पार्वतीनगर, कोंढवा बुद्रुक, पुणे) हिच्याशी निश्चित झाला होता. फेब्रुवारी महिन्यात दोघांचा साखरपुडा पार पडला होता. कुटुंबीयांकडून विवाहाची जोरदार तयारी सुरू होती. मात्र सियाचे चेतन बाबूलाल चौधरी (वय २२) याच्याशी प्रेमसंबंध असल्याने तिला हा विवाह मान्य नव्हता. त्यामुळे सिया आणि केतन यांच्यात वारंवार वाद होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

१८ जून २०२६ रोजी पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावरून पडून केतन अग्रवाल यांचा मृत्यू झाला होता. ट्रेकिंगदरम्यान जोरदार वाऱ्यामुळे त्यांचा तोल गेला आणि ते ४०० फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती. मात्र तपास जसजसा पुढे सरकत गेला, तसतसे या घटनेमागचे धक्कादायक पैलू उघड होत गेले.

पोलिस तपासानुसार, केतन यांची होणारी पत्नी सिया गोयल हिनेच हा अपघात असल्याचा बनाव रचला होता. तपासात सिया आणि तिच्या प्रियकराने मिळून केतनला गडावरून दरीत ढकलून दिल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला अटक केली असून न्यायालयाने दोघांनाही सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

विशेष म्हणजे, १९ जून रोजी सियाचा वाढदिवस होता. तिचा वाढदिवस महाबळेश्वरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्याचं नियोजन अग्रवाल कुटुंबाने केलं होतं. मात्र वाढदिवसाच्या आदल्याच दिवशी सियाने आपल्या होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढल्याचा आरोप आता पोलिस तपासातून पुढे येत आहे.

या घटनेनंतर अग्रवाल कुटुंब पूर्णपणे हादरलं होतं. पण केतनची बहीण सुरुवातीपासूनच या प्रकरणाकडे संशयाने पाहत होती. नेमकं त्या दिवशी लोहगडावर काय घडलं? केतनचा तोल खरोखरच गेला होता का? त्याला वाचवण्याचा प्रयत्न झाला होता का? असे अनेक प्रश्न तिच्या मनात सतत घर करून होते.

केतनवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर चार दिवसांनी सिया गोयल अग्रवाल कुटुंबाच्या घरी सांत्वनासाठी आली होती. त्याचवेळी केतनच्या बहिणीने तिला बाजूला घेऊन लोहगडावर घडलेल्या घटनांबाबत प्रश्न विचारायला सुरुवात केली. मात्र अनेक प्रश्नांची स्पष्ट उत्तरं सियाला देता आली नाहीत. ती सतत उडवाउडवीची उत्तरं देत असल्याचं केतनच्या बहिणीच्या लक्षात आलं.

यामुळे तिचा संशय अधिकच बळावला. तिने तातडीने ही बाब आपल्या कुटुंबीयांच्या कानावर घातली. आधीच दुःखात बुडालेलं अग्रवाल कुटुंब या माहितीमुळे हादरून गेलं. त्यानंतर कुटुंबीयांनी कोणतीही वेळ न दवडता पोलिसांशी संपर्क साधत संपूर्ण माहिती दिली.

पोलिसांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आणि तपासादरम्यान समोर आलेल्या पुराव्यांमुळे अखेर हा अपघात नसून हत्या असल्याचं स्पष्ट झालं. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, याचा शोध घेतला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT