Dr. Nilam Gorhe Sarkarnama
पुणे

Lok Sabha Election 2024 News : गिरीश बापट 'त्या' फोटोतून सांगत असणार यांना मतदान करू नका; गोऱ्हे नेमके काय म्हणाल्या ?

Political News : पुणे शहर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली असून, महाविकास आघाडीकडून कसब्याचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Chaitanya Machale

Pune News : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून, आचारसंहिता सुरू झाली आहे. महायुती तसेच महाविकास आघाडीने काही मतदारसंघांत आपले उमेदवार जाहीर केले आहेत. पुणे शहर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली असून, महाविकास आघाडीकडून कसब्याचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. यामध्ये कसबा, कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, वडगाव शेरी हे मतदारसंघ येतात. या सहा विधानसभा मतदारसंघापैकी चार मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. वडगाव शेरी हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, तर कसबा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे.

भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच मुरलीधर मोहोळ यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे, तर धंगेकरदेखील प्रचारात उतरले आहेत. रायगड येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेत धंगेकर यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. शुक्रवारी दुपारी भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट आणि काँग्रेसचे उमेदवार आमदार धंगेकर यांचा एकत्रित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. 'जो आमदार कसब्याचा तोच खासदार पुणे शहराचा' असा मजकूर लिहून हा फोटो व्हायरल केला जात होता. शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून हा फोटो व्हायरल केला जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

खासदार बापट यांच्यासोबत आमदार धंगेकर यांचा व्हायरल होत असलेल्या फोटोवर विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रचारासाठी खासदार बापट यांचा फोटो वापरल्याबद्दल नीलम गोरे यांनी आमदार धंगेकर यांच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे. त्या म्हणाल्या 'मला असं वाटतं गिरीश बापट त्या फोटोतून सांगत असणार यांना मतदान करू नका.' उलट धंगेकरांनी असे केलं तर निकालाच्या दिवशी त्यांना बापटांच्या फोटोजवळ अश्रू ढाळावे लागतील.

शिवसेनेचे नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काही दिवसांत त्यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेशदेखील होणार आहे. यावर बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, आपतधर्म म्हणून शिवाजीराव आढळराव पाटलांनी असा निर्णय घेतला असावा, राजकीय गणितं बदलली असल्यामुळे त्यांना निर्णय घ्यावा लागला. मात्र, ते उमेदवार महायुतीचे असणार, शिवसेनाप्रमुख यांचे आशीर्वाद आहेत त्यांना, ते नक्कीच निवडून येतील.

माजी मंत्री शिवतारे (vijay Shivatare) यांनी घेतलेल्या भूमिकेवरदेखील गोऱ्हे यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समजूत काढतील. त्यामुळे त्यामध्ये मार्ग निघणार आहे. शिवतारे यांनी आता थांबलं पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे. पक्षाकडून कारवाई होण्याआधी त्यांनी आता माघार घ्यावी, असेही त्या म्हणाल्या. बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्या लढतीवर 'लेक लाडकी या घरची होणार सून मी या घरची’ अशी एका वाक्यात प्रतिक्रिया त्यांनी दिली.

(Edited by : Sachin Waghmare)

R

SCROLL FOR NEXT