Sarkarnama
पुणे

Pruthviraj Chavan On BJP : 'आमचे 'हात' बांधून कबड्डी खेळायला सांगत आहेत', चव्हाण भाजपवर संतापले!

Chetan Zadpe

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आपला पराभव दिसू लागल्याने मोदी सरकारने विरोधकांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने 2017-18 मध्ये मिळालेल्या 17 लाख रुपयांच्या देणगीची माहिती न दिल्याने आयकर विभागाने काँग्रेसला 210 कोटी रुपयांचा दंड लावला आहे. या विरोधात आम्ही आयकर विभागाच्या कोर्टात आमचे म्हणणे सादर केले असून त्यावर अद्यापही सुनावणी घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. ही सुनावणी पूर्ण झालेली नसतानाही आयकर विभागाने काँग्रेस पक्षाचे दहा बँक खाती गोठवून ठेवली आहे. त्यामुळे या खात्यातून दहा रुपयाचा चेक देखील काँग्रेस काढू शकत नाही. लोकसभेच्या निवडणुकीत पराभव दिसू लागल्यानेच मोदी सरकार हे उद्योग करत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे काँग्रेसचे निवडणूक प्रचार प्रमुख पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

"देशात लोकशाही राहिली नाही. मोदी सरकारने सर्व संस्था संघटना आपल्या ताब्यात घेत मनमानी पद्धतीने त्यांचा वापर करत हुकूमशाही आणण्यास सुरुवात केली आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आयकर विभागाने काँग्रेस पक्षाची गोठवलेली बँक खाते ही आहे. प्रत्येक अधिकृत राजकीय पक्षाने दरवर्षी त्यांना मिळालेल्या देणग्यांची माहिती निवडणूक आयोगाला आणि आयकर विभागाला देणे गरजेचे असते. 2017 18 मध्ये केरळमध्ये पुराची स्थिती निर्माण झाली होती. या स्थितीमध्ये काँग्रेसने त्यांच्या खासदारांना मदत म्हणून एका महिन्याचे वेतन देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार काही खासदारांनी ऑनलाइन काहींनी चेकने तर काही खासदारांनी रोख रक्कमेच्या स्वरूपात आपले वेतन काँग्रेसकडे जमा केले," असे चव्हाण म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रोख रक्कम स्वरूपात 17 लाख रुपयांचा निधी काँग्रेसकडे जमा झाला होता. याची माहिती देण्यास आयकर विभागाला सात दिवस उशीर झाला ही वस्तुस्थिती आहे. माहिती वेळेत नाही दिली तर त्यावर दहा हजार रुपये दंडाची तरतूद आहे. मात्र आता 2017-18 मध्ये काँग्रेसने माहिती न दिल्याचा मुद्दा उकरून काढत यासाठी 210 कोटी रुपयांचा दंड भरण्याची नोटीस आयकर विभागाने काँग्रेसला दिली आहे. याविरुद्ध आम्ही आयकर विभागाच्या न्यायाधिकरणाकडे दाद देखील मागितली आहे. मात्र सत्तेचा वापर करत मोदी सरकारने कोणतीही सुनावणी न घेण्यास मोदी सरकार दबाव टाकत आहे. त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलली जात आहे. याचा फायदा घेत आयकर विभागाने काँग्रेसचे बँक खाती गोठवली आहे. दंड भरत नाही तोपर्यंत या खात्यामधून पैसे काढता येणार नाही, असे सांगितले जात आहे. लोकशाही संपवण्याचा हा प्रकार असून येणाऱ्या निवडणुकीत आपला पराभव पक्का असल्याचे लक्षात आल्याने हे प्रकार सुरू असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

निवडणूक आयुक्तांच्या नियमावली मध्ये देखील मोदी सरकारने बदल केले आहेत. त्यांच्या मर्जीतीलच अधिकारी आता निवडणूक आयुक्त होऊ शकतात. हा प्रकार लोकशाहीचे हत्या करणारा आहे. निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेत सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांचा समावेश होता मात्र नव्याने करण्यात आलेल्या नियमावलीमध्ये या सरन्यायाधीशांना यातून वगळण्यात आले आहे. या देशात मुक्त वातावरणात इलेक्शन झाले पाहिजे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे मात्र आता निवडणूक आयुक्तांची नेमणूक केंद्र करत असेल तर ते यामध्ये कसा हस्तक्षेप करतील, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे निवडणुकीत आपला आत्मविश्वास गमावून बसले आहेत. त्यामुळे चौकशी समितांच्या माध्यमातून इतर पक्ष फोडण्याचे काम जोरदार सुरू आहे. इतर पक्षांना बरोबर घेऊन आपली ताकद वाढते का याचा प्रयत्न सुरू आहे. निवडणूक जिंकण्यासाठी रडीचा खेळ अक्षरश: नरेंद्र मोदी यांचा सुरू आहे. काँग्रेसची खाती गोठवण्यात आल्याने काँग्रेसमध्ये जे कामाला आहेत त्यांचे पगार देखील देणे अवघड झाले आहे.

उमेदवारांना निधी तर सोडा वर्तमानपत्रात जाहिराती, इतर कामांसाठी देखील काँग्रेसला पैसे देताना अडचणी येत आहेत. आमचे हात बांधले आहेत आणि तुम्ही आता कबड्डी मॅच खेळा असे आम्हाला सांगितले जात आहे. मोदी सरकारची ही वागणूक अतिशय निषेधार्य आहे आणि खालच्या पातळीवरील आहे. देशातील तसेच महाराष्ट्रातील जनतेने याकडे गांभीर्याने पहात लोकशाही संपवण्यापासून थांबवली पाहिजे, अशी अपेक्षा पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT