Pune voters Sarkarnama
पुणे

Loksabha Election 2024 : पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.., राज्यातील सर्वाधिक मतदार पुण्यातच..!

Number of women voters is more in Ratnagiri, Nandurbar, Gondia, Sindhudurg districts : रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या अधिक

Chaitanya Machale

Pune News : विद्येचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी, आयटी हब अशी ओळख असलेल्या पुणे शहराला आणखी एक मान मिळाला आहे. राज्यातील सर्वाधिक मतदार असलेले शहर अशी नवीन ओळख आता पुणे शहराची झाली आहे. पुण्याची एकूण मतदार संख्या आता 82 लाख 82 हजार 363 वर जाऊन पोहचली आहे. निवडणूक आयोगाने मतदारांची नोंदणी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यावर ठोस पावले उचलत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सकारात्मक पावले उचलण्यात आल्याने मतदारांची संख्या गाठण्यात पुण्याला यश आले आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता जोरदार सुरू झाली आहे. गेल्या महिन्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्चला पत्रकारपरिषद घेत लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. ही पत्रकारपरिषद झाल्यानंतर संपूर्ण देशात आचारसंहिता सुरू झाली आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात ही निवडणूक पार पडणार असून विविध जिल्ह्यातील 48 लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे जिल्ह्याने सर्वाधिक मतदार असलेला जिल्हा म्हणून मान मिळविला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुणे जिल्ह्यापाठोपाठ सर्वाधिक मतदारसंख्या मुंबई उपनगरची आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी 73 लाख 56 हजार 596 इतके मतदार आपला हक्क बजाविणार आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर (Nagpur) जिल्ह्याची एकूण मतदार संख्या 42 लाख 72 हजार 366 इतकी झाली आहे. तर नाशिक जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या 48 लाख 08 हजार 499 इतकी आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या ठाण्याची एकूण मतदार संख्या 65 लाख 79 हजार 588 एवढी झाली आहे. पुणे जिल्ह्याची एकूण मतदार संख्या राज्यात सर्वाधिक असली तरी मतदानाच्या दिवशी मतदारांना बाहेर काढून मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे मोठे आव्हान आता जिल्हा प्रशासनासमोर असणार आहे.

पाच जिल्ह्यात 30 लाखांहून अधिक मतदार

पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर (Kolhapur) या जिल्ह्यांसह अहमदनगर, जळगाव, आणि छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्यांमध्ये 30 लाखांहून अधिक मतदार आहेत. सोलापूरमध्ये एकूण मतदार 36 लाख 47 हजार 141 इतके आहेत. अहमदनगर जिल्ह्यात एकूण मतदार संख्या 36 लाख 47 हजार 252 आहे. कोल्हापूरमध्ये एकूण मतदार 31 लाख 72 हजार 797 इतकी, जळगावमध्ये 35 लाख 22 हजार 289 हे एकूणम मतदार आहेत. छत्रपती संभाजीनगर मध्ये एकूण मतदार 30 लाख 48 हजार 445 इतकी आहे. तर बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, रायगड, मुंबई शहर, बीड, सातारा, सांगली आणि पालघर या 10 जिल्ह्यांमध्ये 20 लाखांहून अधिक मतदार आहेत.

चार जिल्ह्यात महिलांची बाजी

राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदार (Voter) सर्वाधिक आहेत.यामध्ये रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनी बाजी मारली आहे. या चार जिल्ह्यांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदार या अधिक असल्याचे समोर आले आहे. रत्नागिरीमध्ये पुरूष मतदार सहा लाख 31 हजार असून महिला मतदार या सहा लाख 72 हजार आहेत. नंदूरबारमध्ये सहा लाख 37 हजार पुरूष मतदार, तर सहा लाख 39 हजार महिला मतदार आहेत. सिंधुदुर्ग मध्ये तीन लाख 30 हजार पुरूष मतदार तर महिला मतदार तीन लाख 32 हजार इतक्या आहेत. गोंदिया जिल्ह्यात महिला मतदार पाच लाख 51 हजार आहेत. तर पुरूष मतदार संख्या पाच लाख ४१ हजार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT