Congress  Sarkarnama
पुणे

Congress Politics : राज्यातील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांच्या नियुक्त्यांसाठी काँग्रेसचा गनिमी कावा, थेट दिल्लीतून वॉच!

Maharashtra Congress Reshuffle : राज्यातील बहुतांश जिल्हाध्यक्ष बदलले जाण्याची शक्यता असून सुमारे ७० हून अधिक जिल्ह्यांमध्ये नव्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. त्याबरोबर प्रमुख शहरांसह विविध ठिकाणच्या शहराध्यक्ष पदांवरही मोठ्या प्रमाणात बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे जिल्हा आणि शहर पातळीवर नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Sudesh Mitkar

Pune News, 05 Apr : महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला असून राज्यभरातील जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आणि तळागाळात नव्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

असं असलं तरी काँग्रेसमध्ये वर्षानुवर्ष सुरू असलेल्या गटातटाचं राजकारण या निवडीच्या निमित्ताने समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या गटाचा व्यक्ती शहराध्यक्ष व्हावा यासाठी जोरदार फिल्डिंग लागणार आहे. म्हणून योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीची नियुक्ती व्हावी यासाठी केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनी यावेळी एक अनोखी शक्कल राबवली असल्याचं बोललं जात आहे.

राज्यातील बहुतांश जिल्हाध्यक्ष बदलले जाण्याची शक्यता असून सुमारे ७० हून अधिक जिल्ह्यांमध्ये नव्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. त्याबरोबर प्रमुख शहरांसह विविध ठिकाणच्या शहराध्यक्ष पदांवरही मोठ्या प्रमाणात बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे जिल्हा आणि शहर पातळीवर नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

ही संपूर्ण प्रक्रिया ठराविक पद्धतीने राबवली जाणार आहे. इच्छुकांकडून अर्ज मागवले जाणार असून पक्षाचे नियुक्त निरीक्षक जिल्हानिहाय भेटी देऊन स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर प्राप्त झालेल्या अहवालांच्या आधारे संभाव्य उमेदवारांची नावे वरिष्ठ नेतृत्वाकडे पाठवली जातील आणि अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींकडून घेण्यात येणार आहे.

या फेरबदलामध्ये केवळ जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षच नव्हे तर तालुका स्तरावरील संघटना तसेच युवक, महिला, ओबीसी आणि इतर आघाड्यांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच हजारो पदाधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, ही संपूर्ण प्रक्रिया साधारणपणे एका महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

यासाठी दिल्लीतून नेमण्यात आलेल्या ३७ निरीक्षकांना जिल्हानिहाय जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पंधरा दिवसाच्या कालावधीत शहर व जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांना निरीक्षकांकडे अर्ज सादर करावा लागेल. आलेल्या अर्जातील सहाजणांचे पॅनल निरीक्षक तयार करेल. एखाद्याने अर्ज भरला नाही, पण काँग्रेसजनांचा कल त्याच्या बाजूने असेल तर त्याचेही नाव निरीक्षक पॅनलमध्ये पाठवू शकतात.

निरीक्षकांवरही दिल्लीतून 'वॉच'

जिल्हा पातळीवर नेत्यांच्या प्रभावाखाली निरीक्षक 'सेट' होऊ नयेत, म्हणून त्यांच्यावरही दिल्लीतून 'वॉच' ठेवला जाईल. यासाठी एका गुप्त व्यक्तीची नियुक्ती करण्यात येईल. या व्यक्तीची नावे जाहीर केली जाणार नाहीत. ती स्वतंत्रपणे माहिती गोळा करेल आणि निरीक्षक व गुप्त व्यक्तीचा अहवाल जुळतो का, याचीही तपासणी केली जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT