Abdul Sattar Sarkarnama
पुणे

Maharashtra Market Committees: सरकार लवकरच बाजार समित्या घेणार ताब्यात; राष्ट्रीय दर्जा देण्याची प्रक्रिया सुरू

गणेश कोरे

Pune News : बाजार समित्यांना पारंपारिक कायद्यातून बाहेर काढत, आमुलाग्र बदलांसाठी २०१८ साली केलेल्या सुधारणांना महाविकास आघाडीने खोडा घातला होता. मात्र पुन्हा आता महायुतीच्या सरकारने बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे. समितीमध्ये महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्यासह मुख्य सचिव आणि कृषी आणि पणन सचिवांची नियुक्ती केली आहे.

नवीन सुधारणांमुळे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सारखी आर्थिक सत्ता केंद्रे सरकारच्या ताब्यात जाणार आहेत. शेतमाल पणन सुधारणांमधील सर्वात महत्त्वाच्या असणाऱ्या बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देणारी सुधारणा राज्यपालांच्या सहीने २०१८ मध्ये मंजूर करण्यात आली होती. मात्र यानंतरच्या सत्तांतरानंतर महाविकास आघाडी सरकारने या विधेयकाला विरोध करत सुधारणांची प्रक्रिया थांबविली होती.

या सुधारणेमुळे एकूण आवकेच्या ३० टक्के शेतमाल ३ किंवा अधिक राज्यांतून येत असलेल्या बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्यात येणार होता. आता पुन्हा हि प्रक्रिया सुरू केल्याने राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सारख्या बाजार समित्या निवडणुकांमधुन वगळण्यात येणार आहेत.

या समित्यांवर आता शासन नियुक्त २३ जणांचे प्रशासकीय मंडळाची नियुक्तीची शिफारस जुन्या विधेयकात होती. यामुळे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखालील समिती कोणत्या सुधारण सुचविते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. केंद्र सरकारच्या नवीन मॉडेल विविध पणन सुधारणा राज्य सरकारने केल्या आहेत.

यामधील सर्वांत महत्त्वपूर्ण सुधारणांमध्ये ग्रामीण महाराष्ट्रातील सर्वांत मोठी आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या मोठ्या बाजार समित्या स्वतःच्या ताब्यात घेण्याची राजकीय खेळी भाजप सरकारने २०१८ मध्येच केली होती. या खेळीला आता यश येण्‍याची शक्यता निर्माण झाली आहे. बाजार समित्यांवर सनदी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील शासन नियुक्त प्रशासकीय मंडळाची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशेष वस्तू बाजाराची होणार स्थापना

बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा प्राप्त झाल्यानंतर या बाजार समित्यांना विशेष वस्तूंचा बाजारदेखील घोषित करता येणार आहे. यामध्ये फळे, भाजीपाला, फुले, कांदा, सफरचंद, संत्रा, मनुका, हळद, काजू, कापूस, औषधी आणि सुगंधी वनस्पती, पशुधन (गुरे, शेळी, मेंढी, गाढव, घोडा, मासळी, कुकुट आदी) आणि इतर कोणतेही पाच बाजार स्थापन करता येणार आहे.

संचालक मंडळ होणार तातडीने बरखास्त

राज्य सरकारने राष्ट्रीय नामांकित बाजार तळाची अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर लगेच विद्यमान बाजार समिती कार्य करणे बंद करील आणि सर्व विद्यमान समिती सदस्य हे आपले पद धारण करणे बंद करतील असे २०१८ च्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रस्तावित सुधारणांची मुख्य वैशिष्ट्ये

  1. पशुधनाच्या संबंधातील पणनाचे विनिमयन करण्याकरीत तरतुदी

  2. राष्ट्रीय नामांकित बाजारतळ व त्याच्याशी संबंधित आणि अनुषंगिक बाबींकरीत तरतुदी

  3. विविध प्रकारचे बाजार स्थापन करण्याबाबत तरतुदी

  4. बाजार उप तळ म्हणून वखार, सायलो, शीतगृह, इत्यादींकरता तरतुदी

असे असे प्रशासकीय मंडळ

  • सभापती - पणनमंत्री अथवा राज्य सरकारला योग्य वाटेल अशी कोणतीही व्यक्ती

  • उपसभापती - अपर निंबधक (सहकार) पदापेक्षा कमी दर्जाची नसेल असे अधिकारी

  • महसूल विभागातील एक या प्रमाणे ६ शेतकरी प्रतिनिधी

  • दोन राज्यातील सरकारने शिफारस केलेले दोन शेतकरी प्रतिनिधी

  • संबंधित बाजार समितीमधील पाच परवानाधारक व्यापारी

  • कृषी प्रक्रिया संस्थेचा एक प्रतिनिधी

  • केंद्रिय किंवा राज्य वखार महामंडळासह, अधिकृत वखार चालकांचे प्रतिनिधी

  • भारतीय रेल्वेचा प्रतिनिधी

  • सीमा शुल्क विभागाचा प्रतिनिधी

  • संबंधित बाजाराला सेवा देणाऱ्या बॅंकेचा प्रतिनिधी

  • केंद्र सरकारच्या कृषी पणन सल्लागार विभागाचा अवर सचिव दर्जापेक्षा कमी दर्जाची नसलेली व्यक्ती

  • महानगरपालिकेचे आयुक्त किंवा प्रतिनिधी

  • सचिवपदी सहनिबंधक दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसलेला प्रतिनिधी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT