Pimpri-chinchwad Politics|  
पुणे

राज्यपालांच्या आडून भाजपकडून सुरु आहे महाराष्ट्राचा अवमान

Pimpri-chinchwad Politics| घटनात्मक पदावरील राज्यपालांनी आपल्या अकलेची दिवाळखोरी वारंवार दाखवून दिली

उत्तम कुटे: सरकारनामा

पिंपरी : मुंबईतून गुजराती आणि मारवाडी गेले,तर ती देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, तिथे पैसा राहणार नाही, असे महाराष्ट्र व मराठी माणसाचा अपमान करणारे आक्षेपार्ह वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh koshyari) यांनी नुकतेच मुंबईत केले. त्यामुळे त्यांचा राज्यभर निषेध सुरु झाला असून त्यांना परत बोलावण्याची मागणी करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) काल (ता.१) सायंकाळी राज्यपालांविरोधात जोरदार निषेध आंदोलन करून त्यांच्यावर तसाच हल्लाबोल केला. दरम्यान, काल रात्री राज्यपालांनी माफी मागितली असली,तरी त्यांच्याविरुद्धचा रोष कमी झालेला नाही.

घटनात्मक पदावरील राज्यपालांनी आपल्या अकलेची दिवाळखोरी वारंवार दाखवून दिली आहे. पुढारलेल्या महाराष्ट्राला बदनाम करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. त्यांच्याआडून भाजप नेत्यांनी महाराष्ट्राचा अवमान सुरू केला आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी यावेळी केला.राज्यातील जनता कदापी हे सहन करणार नाही. यापुढे मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा अवमान, बदनामी करणाऱ्यांना राष्ट्रवादी धडा शिकवेल.महाराष्ट्रात फूट पाडण्याचे आणि राज्याचा अवमान करणाचे षडयंत्र राज्यपालांच्या आडून ज्या भाजपने जे सुरू केले आहे तिलाही जनता धूळ चारल्याशिवाय गप्प बसणार नाही,असा इशारा त्यांनी दिला.

महाराष्ट्राचा, इथल्या मातीचा इथल्या माणसांबद्दल बोलताना राज्यपालांनी पूर्ण अभ्यास करूनच तोंड उघडावे. आपल्या बोलवित्या धन्याचे ऐकण्याऐवजी महाराष्ट्राचा इतिहास जाणून घ्यावा आणि मगच बोलावे,असा सल्लाही त्यांनी दिला महिला शहर अध्यक्ष कविता आल्हाट, प्रवक्ते विनायक रणसुभे तसेच माजी नगरसेव क नारायण बहिरवाडे, विजय लोखंडे, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, वर्षा जगताप, संगीता ताम्हाणे, शमीम पठाण, यश साने, मनीषा गटकळ, माधव पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

"देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा असल्याचे राज्यपाल विसरले असावेत. त्यांनी केलेल्या अपमानाचा मराठी माणूस बदला घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. येत्या महापालिका निवडणुकीत महाराष्ट्राला कमी लेखणाऱ्या भाजपला पिंपरी-चिंचवडची जनता नक्कीच जागा दाखवून देईल, असे आल्हाट म्हणाल्या.तर,इंग्रजांची 'फोडा आणि राज्य करा' ही नीती भाजपकडून सध्या राबविली जात आहे. त्यामुळेच राज्यपालासारख्या महत्त्वाच्या व्यक्तीचाही महाराष्ट्राच्या व मराठी माणसांच्या एकीला सुरुंग लावण्यासाठी सातत्याने वापर केला जात आहे. मात्र महाराष्ट्र राज्य निर्माण होताना ज्या मराठी बांधवांचे रक्त सांडले त्या बांधवांचे हौतात्म्य आम्ही वाया जाऊ देणार नाही,असे रणसुंभे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT