मंचर (पुणे) : नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर पक्षातून इनकमिंग-आऊटगोईंग सुरु आहे. सर्वच पक्षात मोठे राजकीय नाट्य घडण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी न मिळालेले अनेक इच्छुक उमेदवार कमालीचे नाराज झाले आहेत. या नाराजीतून अनेक जण अन्य पक्षांमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. तर काहींनी अन्य पक्षांत उड्या घेतल्या आहेत.
नगरपंचायत, नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका हटके संदेशाची सध्या पुणे जिल्ह्यात सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. “ज्यांना कोणत्याही पक्षाने तिकीट दिले नाही… त्यांना आम्ही तिकीट देऊ. आमच्या तिकिटाने या गावातून त्या गावात जाता येते, पण या पक्षातून त्या पक्षात नाही.” — अशा मार्मिक आशयाच्या संदेशासोबत एसटी बसचा फोटोही जोडलेला आहे.
प्रत्येक पक्षात उमेदवारी मिळण्यासाठी स्पर्धा व पक्षांतराची रेलचेल सुरू असताना डोळ्यात अंजन घालणारा हा संदेश नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे. हा व्हिडीओ–मिमक्री शैलीतील संदेश विविध व्हाट्सअॅप गटांमध्ये मोठ्या गतीने प्रसारित होत आहे. इच्छुक उमेदवारांमध्येही या संदेशाची चर्चा आहे. हा संदेश वाचल्यानंतर अक्षरशः हास्याचे फवारे उडतात अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.
मंचर (ता.आंबेगाव) येथे आज सकाळी हा संदेश एका हौशी कार्यकर्त्यांनी राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना दाखवला असता, त्यांनाही हसू आवरता आले नाही, उपस्थित इच्छुक ही झालेल्या हश्यामध्ये सहभागी झाले.
एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, पक्षांतर्गत वाढलेली ही नाराजी पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकते. तिकीट न मिळालेले नाराज उमेदवार पक्षात राहून काम करतील की, बंडखोरीचा पवित्रा घेतील, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
या संपूर्ण परिस्थितीत नाराज इच्छुकांनी मनधरणी करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांचा कस लागणार आहे. नाराज इच्छुक उमेदवारांना इतर पक्षांमध्ये प्रवेश करण्यापासून थांबवण्यात आणि त्यांची समजूत काढण्यात ते यशस्वी ठरतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.