BJP's first list for Maharashtra Sarkarnama
पुणे

BJP's first list for Maharashtra: पुण्यात पुन्हा विद्यमानांना संधी; तीन जागांचा सस्पेन्स अद्यापही कायम

Maharashtra Vidhan Sabha Election BJP First list Pune: चंद्रकांत पाटील हे दुसऱ्यांना निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी या ठिकाणी त्यांच्या उमेदवारीला आव्हान देत आपल्याला संधी मिळावी असं पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली होती

Sudesh Mitkar

Pune News: विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर सर्वांनाच प्रतीक्षा असलेली भाजपची पहिली उमेदवारी यादी प्रसिद्ध झाली आहे. यादीमध्ये पुण्यातील तीन विधानसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. या तिन्ही मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.

भारतीय जनता पार्टी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक नुकतीच जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह जी, गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय निवडणूक समितीचे इतर सदस्य या बैठकीत उपस्थित होते.

बैठकीत आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी केंद्रीय निवडणूक समितीने 99 उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामध्ये पुण्यातील तीन उमेदवारांचा समावेश आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री चंद्रकांत पाटील हे दुसऱ्यांना निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती. मात्र दरम्यानच्या काळामध्ये भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी या ठिकाणी त्यांच्या उमेदवारीला आव्हान देत आपल्याला संधी मिळावी असं पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली होती. मात्र आता चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे बालवडकर नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना पुन्हा एकदा भाजपने संधी दिली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपाला अवघं काही हजार मतांच लीड मिळालं होतं. त्यामुळे या ठिकाणी उमेदवार बदलणार अशा चर्चा होती. भाजपने पुन्हा एकदा सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर विश्वास दाखवला असून त्यांना शिवाजीनगरमधून उमेदवारी दिली आहे.

पर्वती विधानसभा मतदारसंघांमधून सलग तीन वेळा निवडून आलेल्या माधुरी मिसाळ यांना भाजपने चौथ्यांदा संधी दिली आहे. त्या ठिकाणी भाजपचे महापालिकेतील ज्येष्ठ नेते श्रीनाथ भिमाले यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते.

आचारसंहिता लागण्यापूर्वी त्यांची महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर महामंडळ देऊन त्यांना विधिमंडळासाठी शांत बसण्याचा सूचना देण्यात आल्याचा देखील चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे आता महामंडळ घेऊन श्रीनाथ भिमाले शांत बसणार का बंडाचे निशाण फडकवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या मतदारसंघांबाबत सस्पेन्स कायम

तीन मतदारसंघाची घोषणा करण्यात आलेली असली तरी भाजपच्या वाटेला असलेल्या कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. खडकवासला आणि पुणे कॅन्टोन्मेंट या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आहेत. मात्र पक्षांतर्गत त्यांना उमेदवारी देण्यावरून विरोध असल्याचे पाहायला मिळत आहे.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात ब्राह्मण उमेदवार द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. अशा परिस्थितीत पोटनिवडणुक लढलेले हेमंत रासने यांना भाजप पुन्हा निवडणूक रिंगणात उतरणार की धीरज घाटे अथवा इतर ब्राह्मण चेहरा भाजप पुढे करणार याबाबतचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT