पुणे

गिरीष महाजन शिवतारेंचा पाठशिवणीचा खेळ

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : जायकवाडी धरण तुडुंब भरल्यानंतर आढावा बैठक आणि जलपूजनाचे नियोजन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आठवडाभरापुर्वीच केले होते. पण जलसंपदा विभागाचा मी कॅबिनेटमंत्री असतांना जलपूजनाचा मान राज्यमंत्र्यांना कसा? म्हणून गिरीष महाजन यांनी घाईगडबडीत औरंगाबाद गाठत जायकवाडीला भेट दिली आणि जलपूजनाचा मानही घेतला. शिवसेना-भाजप मंत्र्यामधील 'तु तू मै मै' च्या धर्तीवर गिरीष महाजन यांनी शिवतारे यांच्या सोबत केलेल्या पाठशिवणीच्या खेळाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

सत्तेतून बाहेर पडण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांना भाजपच्या मंत्र्यांकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे नेहमीच बोलले जाते. जलसंपदा विभागाचे मंत्री गिरीष महाजन आणि याच खात्याचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या बाबतीत असाच काहीसा प्रकार औरंगाबादेत बघावयास मिळाला. नियोजित दौऱ्यानुसार विजय शिवतारे आज सकाळी जायकवाडी धरणाची पाहणीसाठी गेले होते. या पाहणी दरम्यानच त्यांच्या हस्ते धरणातील पाण्याचे जलपूजन करण्यात येणार होते. पण अचानक जलसंपदा मंत्री गिरीष महाजन हे देखील दुपारी औरंगाबादेत येणार असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. त्यामुळे प्रोटोकॉल पाळत शिवतारे यांनी जलपूजन टाळत फक्त धरणाची पाहणी केली.

महाजनांचे लॅंडिंग, शिवतारेचे टेकऑफ
जायकवाडी धरणाची पाहणी करून परतल्यानंतर शिवतारे यांनी औरगाबादेत अधिकाऱ्यां सोबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद देखील साधला. गिरीष महाजन हे चार वाजता औरंगाबादेत येणार होते. परंतु, शिवतारे यांनी महाजनांची भेट टाळत त्यांच्या विमानाचे लॅंडिग होण्याआधीच टेकऑफ केले. औरंगाबादेत दाखल होताच गिरीष महाजन यांचा ताफा जायकवाडीकडे रवाना झाला. तिथे जलसंपदा विभागाचे अधिकारी, भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महाजनांनी धरणातील पाण्याचे जलपूजन केले. त्यांनतर सिंचन भवनात सायंकाळी 6 वाजता पत्रकार परिषद घेतली.

आमच्यात चांगला समन्वय
एकाच दिवशी जलसंपदा विभागाचे दोन्हीमंत्री शहरात वेगवेगळे कसे, जलपूजनाचा मान शिवसेनेच्या मंत्र्याला मिळू नये यासाठी महाजनांना अचानक दौरा केला का? अशा प्रश्‍नांचा भडीमार पत्रकारांनी करताच, शिवतारे आणि माझ्यात खूप चांगला समन्वय असल्याचे सांगत महाजनांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. जळगावमधील माझे दोन कार्यक्रम रद्द झाल्यामुळेच मी औरंगाबादेत येऊ शकलो. मी कॅबिनेटमंत्री आहे कुठेही जाऊ शकतो. जलसंपदा विभागाशी संबंधित सगळे निर्णय मी, शिवतारे आणि मुख्यमंत्री एकत्रितपणे घेत असतो. इतर कुठल्याही खात्यापेक्षा आमच्यात जास्त समन्वय असल्याचा दावा देखील गिरीष महाजन यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT