पुणे

बक्षिसाच्या रकमेसाठी नगरसेवकांनी अधिकाऱ्याच्या केबिनमध्येच खेळला कॅरम

महेंद्र बडदे

पुणे : पुणे महापालिकेने डिसेंबर महिन्यात घेतलेल्या कॅरम आणि बुद्धीबळ महापौर चषक स्पर्धेतील विजेत्यांना अद्याप बक्षिसाची रक्कमच दिली नसल्याचे लक्षात आले आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या नगरसेवकांनी शुक्रवारी क्रिडा अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच कॅरम खेळून आंदोलन केले.
 
महापालिकेने डिसेंबर 2017 आयोजित केलेल्या कॅरम, बुद्धीबळ स्पर्धेतील विजेत्यांच्या बॅंक खात्यात थेट पैसे जमा केले जाणार होते. स्पर्धा होऊन आठ महिने उलटले तरी या विजेत्यांना पैसेच मिळाले नाही. याबाबत खेळाडूंनी महापालिकेकडे अनेक वेळा तक्रार केली होती. या खेळाडूंना त्यांच्या बक्षीसाची रक्कम मिळावी यासाठी मनेसेचे गटनेते वसंत मोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांनी शुक्रवारी क्रिडा अधिकारी तुषार दौंडकर यांच्या कार्यालयात कॅरम खेळला आणि खेळाडूंच्या मागणीकडे लक्ष वेधले.
 
या स्पर्धेत सुमारे दीड हजार स्पर्धक सहभागी झाले होते. बक्षीसाची रक्कम थेट बॅंक खात्यात जमा होणार असल्याने स्पर्धा आयोजक क्रिडासंघटकांनी स्पर्धकांच्या बॅंक खात्याची माहिती प्रवेश अर्जासोबत घेतली होती. प्रत्येक फेरीतील विजयासाठी खेळाडूला 300 रुपये दिले जाणार होते. स्पर्धा संपल्यानंतर आठ महिने झाले तरी खेळाडूंना पैसे मिळाले नाही ही बाब भुषणावह नाही असे मोरे यांनी सांगितले.

याबाबत क्रिडा अधिकारी दौंडकर म्हणाले, "" स्पर्धा संयोजन करणाऱ्या संस्थेकडून आठशे स्पर्धकांच्या बक्षीसाची रक्कम मागितली होती. प्रत्यक्षात दीड हजारांहुन अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यामुळे हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ज्यांना रक्कम मिळाली नाही. त्यांचे धनादेश तयार करून ती देण्याची व्यवस्था केली जात आहे.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT