Manoj Jarange and Laxman Hake sarkarnama
पुणे

Maratha-OBC Andolan : आता आझाद मैदानावरुन मराठा-ओबीसी संघर्ष पेटणार? दोन्ही आंदोलनांची एकाच ठिकाणी हाक; आधी अर्ज कोणी केला? प्रशासनापुढे पेच

Maratha-OBC Andolan : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक देत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.

Sudesh Mitkar

Maratha-OBC Andolan : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक देत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. २९ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या आंदोलनासाठी जरांगेंनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात रीतसर परवानगी मागितली आहे. मात्र, जरांगेंच्या या अर्जापूर्वीच ओबीसी आंदोलकांनी त्याच मैदानासाठी आधीच अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.

ओबीसींच्या हक्कासाठी २८ ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या परवानगीसाठी ॲड. मंगेश ससाणे यांनी १२ ऑगस्ट रोजीच आझाद मैदान पोलीस ठाणे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज सादर केला आहे. त्यामुळे परवानगीच्या प्रक्रियेत ‘फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह’ या नियमानुसार ओबीसी आंदोलनालाच प्रथम प्राधान्य मिळायला हवे, अशी आक्रमक भूमिका ॲड. ससाणे यांनी घेतली आहे.

जरांगेंचं वरातीमागून घोडे चालणार नाही - ससाणे

प्रशासकीय नियमांवर बोट ठेवत ॲड. मंगेश ससाणे म्हणाले, "आम्ही कायद्यानुसार आणि वेळेआधीच अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांचे वरातीमागून घोडे आले तरी चालणार नाहीत. प्रशासनाने अर्जाची तारीख आणि नोंदणीचा क्रम लक्षात घेऊनच योग्य तो निर्णय घ्यावा"

ओबीसी, व्हीजेएनटी तसेच अलुतेदार-बलुतेदार समाजाच्या घटनात्मक हक्कांच्या रक्षणासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाची पुढील रणनीती आणि नियोजनाबाबत लवकरच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन अधिकृत घोषणा केली जाईल, असेही ससाणे यांनी स्पष्ट केले.

एकीकडे मनोज जरांगे पाटील मुंबईत पुन्हा एकदा आरक्षणाचे वादळ घेऊन धडकण्याच्या तयारीत आहेत, तर दुसरीकडे ओबीसी संघटनांनी आधीच मैदान बुक करण्यासाठी अर्ज सादर करून कायदेशीर पेच निर्माण केला आहे. दोन महत्त्वाच्या घटकांकडून एकाच मैदानासाठी आणि जवळपास एकाच कालावधीत मागणी झाल्यामुळे पोलीस प्रशासन नक्की कोणाला परवानगी देणार आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न कसा हाताळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT