Chhagan Bhujbal Sarkarnama
पुणे

Maratha Vs OBC : तुमची गाडी फोडायला वेळ लागणार नाही ! छगन भुजबळांना धमकी

Sunil Balasaheb Dhumal

चैतन्य मचाले

Pune Political News : मराठा - ओबीसी आरक्षणावरून राज्यात जोरदार वाद पेटत असताना सोमवारी याचे पडसाद पुण्यातही उमटले. राज्याचे अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ सोमवारी पुणे दौऱ्यावर आलेले आहेत. कॅम्प परिसरातील शासकीय विश्रामगृहात एक बैठक होते. त्यावेळी स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी या ठिकाणी धडक देत थेट छगन भुजबळ यांना त्यांची गाडी फोडण्याचा इशारा दिला. या प्रकारामुळे येणाऱ्या काळात ओबीसी मराठा आरक्षणाचा वाद अधिकच पेटण्याची शक्यात आहे.

शासकीय विश्रामगृहात स्वराज्य संघटनेने केलेल्या या प्रकारामुळे ओबीसी कार्यकर्तेदेखील चांगलेच आक्रमक झाले असून, हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. एकमेकांच्या विरोधात आक्रमक होत हे दोन्ही नेते कडक शब्दांत टीका टिप्पणी करत आहेत.

पुण्यात मंगळवारी आयोजित कार्यक्रमासाठी भुजबळ हे पुणे दौऱ्यावर आलेले आहेत. ते सोमवारी सकाळी शासकीय विश्रामगृहात कार्यकर्ते तसेच ओबीसी समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. त्याचवेळी धनंजय जाधव तेथे आले. जाधव यांनी आपली गाडी छगन भुजबळ यांच्या गाडी शेजारी लावली. त्यानंतर भुजबळांना दोन्ही गाड्यांमधील अंतर दाखवत तुमची गाडी फोडण्यासाठी फार वेळ लागणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धनंजय जाधव म्हणाले की, 'मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे. राज्यात ओबीसी-मराठा वाद निर्माण होऊ नये, अशी श्रीमंत संभाजीराजे छत्रपती यांची भूमिका आहे. त्यासाठी ते प्रयत्न करत असताना दुसरीकडे छगन भुजबळ हे समाजात वाद निर्माण होतील, अशी विधाने करत आहेत. मराठा नेत्यांचे हात-पाय तोडण्याची धमकी देत आहेत. आम्ही आता केवळ इशारा दिला आहे. प्रत्यक्ष कृती करण्यासाठी आम्हाला थोडाही वेळ लागणार नाही.'

जाधव यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ओबीसी समाजातील कार्यकर्तेदेखील आता आक्रमक झाले आहेत. असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. वेळप्रसंगी जशाच तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. मराठा-ओबीसी कार्यकर्त्यांमधील सुरू झालेले शाब्दिक हल्ल्यांमुळे राजकीय वातावरण तापणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT