तळेगाव दाभाडे (पुणे): गेल्या निवडणुकांमध्ये पुणे जिल्ह्यात मावळमध्ये भाजपला सलग पराभव सहन करावा लागला आहे, या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींनी मावळात भाजपने भाकरी फिरवली आहे. पक्षाची सर्वाधिकार असलेली कोअर कमिटी बरखास्त केली आहे.
नव्या कोअर कमिटीमध्ये तरुण नेतृत्वाला संधी देत संघटनात्मक पुनर्बांधणीवर भर दिला जाणार आहे. तरुण आणि कार्यशील कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर संधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पक्षात नवचैतन्य निर्माण झाला आहे.
अंतर्गत गटबाजी आणि बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. भाजपचा हा निर्णय मावळात केवळ संघटनात्मक बदल नसून नव्या पर्वाची सुरुवात मानली जात आहे. अनुभवी नेतृत्वाचा मार्गदर्शनासह तरुणांची ऊर्जा एकत्र आल्यास आगामी काळात मावळच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, कोअर कमिटीचे अध्यक्ष निवृत्ती शेटे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची नुकतीच पवानानगर येथे बैठक झाली. यात हा कोअर कमिटी बरखास्त करण्यात आली.
आगामी निवडणुकीत रणनीती, संघटनात्मक बदल, पक्षविरोधी कारवायांवर आदी विषयावर बैठकीत चर्चा झाली. बूथस्तरावरील मजबुती,आधुनिक निवडणूक रणनीती आणि तळागाळातील संवाद वाढविणे यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
मावळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांवर १९९२ ते २०२३ या कालावधीत भाजपचे वर्चस्व होते. १९९४ ते २०१९ या काळात विधानसभा पातळीवरही मावळचा गड भाजपकडेच होता. संघटनबांधणी, निष्ठावंत कार्यकर्ते आणि प्रभावी नेतृत्व यामुळे भाजपचा वारु जोरात होता. मात्र २०१९ नंतर राजकीय समीकरणे बदलू लागली. पक्षाची पिछेहाट झाली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालेला १५-० असा पराभव पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत संघटनात्मक बदलांची मागणी केली होती. पक्षातील निष्ठा आणि कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा आरोप असलेल्या कार्यकर्त्यांची नावे वरिष्ठांकडे पाठवण्यात आली आहे. त्यांच्यावर लवकरच शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.