Shrirang Barne Sarkarnama
पुणे

Shrirang Barne : मावळात लोकसभेला मीच उमेदवार; बारणेंनी केलं जाहीर, भाजप-राष्ट्रवादीची भूमिका काय ?

Maval Lok Sabha Constituency: '2024 ला मावळात लोकसभेला मीच उमेदवार आणि निवडूनही येणार'; खासदार श्रीरंग बारणे यांचं मोठं विधान

उत्तम कुटे

Pimpri News: मावळात दोन दिवसांपूर्वी महायुतीतच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार सुनील शेळके यांनी खासदार श्रीरंग बारणे यांनी तिसऱ्यांदा उमेदवारी मागण्यापूर्वी आपल्या नऊ वर्षांच्या कामाचा लेखाजोगा मावळवासीयांना द्यावा, अशी मागणी केली होती. त्याला उत्तर देताना बारणे यांनी शेळकेंचे वक्तव्य हे राजकीय सूड आणि द्वेषातून असल्याचे सांगत त्याला उत्तर देण्याची गरज नाही, असा पलटवार गुरुवारी केला.

माझी बांधिलकी ही जनतेशी असून, त्यांनी मला निवडून दिलेले असल्याने मी काय कामे केली, त्यांना सांगणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे मी केलेल्या कामाचा लेखाजोगा त्यांना देत आहे, असे बारणे यांनी शेळकेंना सुनावले. लोणावळा नगरपरिषदेची आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी आपल्यावर शेळकेंनी केलेल्या खळबळजनक आरोपांचा समाचार घेतला. तसेच 2024 ला मावळ लोकसभा मतदारसंघात आपणच उमेदवार असल्याचा दावा केला. तसेच कामाच्या जोरावर निवडूनही येणार असल्याचे बारणे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोणी राजकीय द्वेषापोटी आरोप करीत असतील, तर त्यांची पार्श्वभूमी बघितली पाहिजे, असा टोला त्यांनी शेळकेंना लगावला. तसेच शेळकेंनी कोणी हे बोलायला लावते आहे का, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

मोदी लाटेवर उमेदवारी मागणे व निवडून येणे आता सोपे राहिले नाही, असे सांगत शेळकेंनी परवा बारणेंना डिवचले होते. तसेच दोन्ही टर्मला ते मोदी करिष्म्यामुळे निवडून आल्याचेही ते म्हणाले होते. त्याला तसेच खणखणीत उत्तर बारणेंनी दिले.

2024 ला मावळात मीच उमेदवार असून, माझ्या कामाच्या जोरावर निश्चित निवडून येणार असल्याचा दावा करीत शेळकेंना त्यांनी प्रतिआव्हान दिले. हा माझा आत्मविश्वास असल्याचे सांगत त्याचवेळी तो ओव्हर कॉन्फिडन्स नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले. 2014 आणि 2019 ला नरेंद्र मोदी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावून मी निवडून आलो होतो. ते 2024 ला पुन्हा लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोदींविषयी त्यांना द्वेष का, अशी विचारणा त्यांनी केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर दिल्लीतील बैठकीत आपली उमेदवारी फाय़नल झाली असल्याचा पुनरुच्चार बारणेंनी या वेळी केला. तसेच या वेळी मावळवर लोकसभेला दावा केल्याचा शेळकेंच्या वक्तव्यावर त्यांनाही उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे, असे ते म्हणाले. असा क्लेम ठोकून ते दुसऱ्या पक्षासाठी वातावरण निर्मिती करीत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. शेळकेंशी माझे चांगले संबंध असून, वैयक्तिक वाद, द्वेष नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तरीही त्यांनी परवा माझ्यावर आरोप का केले हे त्यांना भेटल्यावर विचारेल, असे बारणे म्हणाले.

(Edited By - Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT