Medha Patkar | Vishwambhar Choudhari  Sarkarnama
पुणे

मेधा पाटकरांविरोधातील तक्रारीवरुन विश्वंभर चौधरी भाजपवर संतापले, म्हणाले...

Medha Patkar | Vishwambhar Choudhari | ED : मेधा पाटकर यांच्याविरोधात ईडीकडे १७ वर्षांपूर्वीच्या संशयित व्यवहारांवरुन तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : सातत्याने राजकीय विरोधकांना टार्गेट करत असल्याचा आरोप होत असलेल्या ईडी (ED) अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर आता जेष्ठ पर्यावरणवादी नेत्या मेधा पाटकर (Medha Patkar) या आल्या आहेत. त्यांच्या नर्मदा नवनिर्माण अभियान या एनजीओच्या खात्यावर काही संशयित व्यवहार झाल्याच्या आरोपात त्यांच्याविरोधात संजीव कुमार झा यांनी तक्रार दाखल केली आहे. २००५ सालातील म्हणजे तब्बल १७ वर्षांपूर्वीचे हे प्रकरण आहे. ईडीशिवाय महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) आणि आयकर विभागातही (Income Tax) पाटकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नर्मदा नवनिर्माण अभियान या एनजीओच्या बँक ऑफ इंडियाच्या 001010100064503 या अकाऊंटवर १८ जून २००५ या एका दिवशी १ कोटी, १९ लाख, २५ हजार ८८० रुपयांच्या देणग्या मिळाल्या. पण ही सर्व रक्कम २० वेगवेगळ्या खात्यांवरुन ५ लाख ९६ हजार २९४ रुपयांच्या एक समान रक्कमेच्या व्यवहारांच्या स्वरुपात जमा झाली होती. शिवाय ही रक्कम जमा करणाऱ्या एक देणगीदारांपैकी पल्लवी प्रभाकर भालेकर या त्यावेळी अल्पवयीन होत्या, असा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. सोबतच लॉकडाऊन काळात माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडकडून मिळालेल्या देणग्यांचाही तपास करण्यात यावा अशी मागणी या तक्रारीमध्ये करण्यात आली आहे.

मात्र या सर्व प्रकरणावर समाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी ही तक्रार खोटी असल्याचे म्हटले आहे. तसेच भाजपवाले नीचतेच्याही एक पायरी खाली उतरले आहेत, अशी टीका केली आहे.

काय म्हणाले डॉ. विश्वंभर चौधरी?

विश्वंभर चौधरी म्हणाले, 'संजीव झा' नावाच्या एका भाजप कार्यकर्त्याने मेधाताई आणि नर्मदा नवनिर्माण ट्रस्ट विरोधात एक निखालस खोटी तक्रार दिली. तक्रारीत कोणतेही तथ्य नाही, १७ वर्षांपूर्वी बँकेत देणग्या जमा झाल्या असा खोटा आरोप केला. माझगाव डॉकयार्ड या सरकारी कंपनीने त्यांच्या सीएसआर फंडातून या ट्रस्टसह नंदूरबार मधील अनेक संस्थांना रितसर चेकद्वारे मदत केली. नर्मदा नवनिर्माणच्या शाळांमधील विस्थापित आदिवासी मुलांना जेवण देण्यासाठी दोन वर्ष हा निधी त्यांनी दिला. त्यावरही जणू काही हा निधी म्हणजे घोटाळा आहे अशा स्वरूपाची तक्रार दिली आहे.

आज या वेळेपर्यंत ईडी किंवा इन्कम टॅक्सकडून कोणतीही नोटीस नाही अशी माझी माहिती आहे. पण एवढं निमित्त पुरले आणि भाजपाचा महाविकृत मिडीया सेल जागा झाला, ताईंनी आणि ट्रस्टने जणू काही भयंकर घोटाळा केला असे सुचित करणाऱ्या शेकडो पोस्ट रात्रीतून तयार करून फिरवल्या जात आहेत. अनेकांनी इनबॉक्समधून त्या पोस्ट्स मलाही पाठवल्या आहेत. हा सगळा किळसवाणा अपप्रचार आहे. यापासून सावध रहा, असेही डॉ. विश्वंभर चौधरी यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT