जयराम सुपेकर :
सुपे : पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा (Pune Airport)प्रश्न अनेक वर्षांपासून रेंगाळत आहे. या विमानतळाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''पुणे जिल्ह्यातील नियोजित विमानतळासंदर्भात या पंधरवड्यात संबंधितांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लागेल,'' अशी माहिती शरद पवार यांनी आज दिली. बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलाच्या इमारत पाहणीच्या वेळी पत्रकारांशी पवार बोलत होते.
शरद पवार म्हणाले, ''विमान तळासंदर्भात जागा निश्चित झाल्या, पण संरक्षण खात्याने हरकत घेतली. त्यामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. पुढील पंधरा दिवसात मी स्वतः, खासदार सुप्रिया सुळे आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी मिळून संरक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार आहोत,''
''संरक्षण खात्याचा पुण्यात विभाग आहे. त्यांची विमाने रोज सकाळी सरावासाठी या भागातून जात असतात. संरक्षण खात्याची भूमिका काय आहे हे समजून घ्यावी लागेल. आणि त्यानंतरच विमानतळासंदर्भातील मार्ग काढला जाईल,'' असे पवार म्हणाले.
पुणे जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील विमानतळ नेमके कोठे होणार हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यात आहे. विमानतळ चाकणला होणार का पुरंदर तालुक्यात होणार याबाबत जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा चालू आहे. याबाबत पवार यांनी येत्या पंधरवड्यात हा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे सुतोवाच केले. त्यामुळे या होणाऱ्या बैठकीकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
बारामती, दौंड व पुरंदर तालुक्यांच्या लगतच्या गावांसाठी सुपे हे मध्यवर्ती बाजार पेठेचे गाव असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. गावात विद्या प्रतिष्ठानचे मोठे शैक्षणिक संकुल उभारले जात आहे. त्या बरोबरच उपजिल्हा रूग्णालय, मोठी बाजार पेठ होऊ घातली आहे. याबाबत त्यांना विचारले असता. '' विमानतळाचा प्रश्न माझ्याशी संबधित आहे,'' असे पवार म्हणाले.
पूर्वनियोजनानुसार हे विमानतळ खेड तालुक्यात होणार होते. परंतु तेथील स्थानिकांनी विमानतळासाठी आवश्यक असणारी जागा देण्यास नकार दिला. या विमानतळाला आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र विरोध केला. त्यामुळे सरकारने या विमानतळाची जागा बदलण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार हेच विमानतळ पुरंदर तालुक्यात हलविले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावित विमानतळाचे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरणही जाहीर केले आहे.
खेड तालुक्यातील शेतकऱ्यांप्रमाणेच पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनीही या विमानतळाला जमिनी देण्यास प्रथमपासून तीव्र विरोध सुरु केला आहे. या विरोधामुळे तेथील जागेबाबत तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. ही अडचण दूर करण्यासाठी काही अंशी जागा बदलण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिला होता. परंतु हा प्रस्ताव तांत्रिक अडचणीमुळे अद्याप मंजूर होऊ शकला नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित विमानतळ जागेअभावी होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.