Sangram Thopte
Sangram Thopte Sarkarnama
पुणे

संग्राम थोपटेंची आमदारकीपाठोपाठ ‘राजगड’च्या अध्यक्षपदाची हॅट्‌ट्रीक!

किरण भदे

नसरापूर (जि. पुणे) : राजगड सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा भोरचे (Bhor) आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांची निवड करण्यात आली. आमदारकीनंतर कारखान्याच्या अध्यक्षपदाची थोपटे यांनी हॅटट्रीक केली आहे. ते २००९ पासून भोरचे काँग्रेसचे (Congress) आमदार आहेत, त्यांनी २०१४ आणि त्यानंतर २०१९ ची विधानसभा निवडणूक जिंकलेली आहे. तेव्हापासूनच त्यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदाचीही जबाबदारी सांभाळली आहे. (MLA Sangram Thopte elected as President of Rajgad Sugar Factory)

दरम्यान, कारखान्याच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी पोपटराव सुके यांच्याकडे एकमताने सोपविण्यात आली आहे. नव्या संचालक मंडळाच्या उपस्थितीत आज (ता. ९ जून) या दोन्ही निवडी करण्यात आल्या. संचालक मंडळाच्या बैठकीत नव्या यंत्रसामुग्रीसह राजगड कारखान्याची नव्याने पुर्नउभारणी करण्याचा संकल्प करण्यात आला, त्यासाठी नव्याने भागभांडवल उभारणी करण्यात येणार आहे.

राजगड कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व १७ जिंकत एकहाती सत्ता मिळवलेल्या काँग्रेसप्रणित राजगड सहकार पॅनेलच्या संचालकांची पहिली कारखाना कार्यस्थळावर झाली. या बैठकीत अध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा आमदार संग्राम थोपटे यांच्याकडे सोपवण्यात आली, तर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सलग दुसऱ्यांदा संचालक झालेले उद्योजक पोपटराव सुके यांच्यावर सोपवण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भोरचे प्रांत राजेंद्र कचरे, वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे उपस्थित होते.

आमदार संग्राम थोपटे म्हणाले की, राजगडची वाटचाल नेहमीच संघर्षातून झाली आहे, तरीही एक वर्ष अपवाद सोडता गेले तीस वर्ष कारखाना अव्याहतपणे चालू राहिला आहे. अश्यक्यप्राय संकल्पनेतून अनंतराव थोपटे यांनी कारखाना उभा केला आहे. आता त्यांच्या डोळ्यादेखत कारखाना नव्या यंत्रसामुग्रीस उभा करण्याचे आम्ही सर्व संचालकांनी संकल्प केला आहे. त्याचे भूमिपूजन येत्या दिवाळीमध्ये करण्यात येणार आहे. सर्व संचालक व कारखान्यास सहकार्य करणाऱ्या संस्था, नागरिकांकडन नव्याने भाग भांडवल उभारणार आहे. सुमारे साडेतीन हजार टन क्षमतेचे गाळप असणारा नवीन कारखाना उभा केला जाणार आहे, त्या बरोबरच १८ मेगावॉट वीजनिर्मिती, ४५ केएलपीडी क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प सुरु केला जाणार आहे, त्यामुळे परिसरातील सर्व ऊस गाळप होऊन शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल.

या वेळी संचालक शिवाजीराव कोंडे, के. डी. सोनवणे, दिनकर धरपाळे, सुभाष कोंढाळकर यांची भाषणे झाली. राजगड कारखान्याला थोपटे यांच्याच नेतृत्वाची गरज असून कारखान्याच्या पुनरूज्जीवनासाठी कोणतीही जबाबदारी स्वीकारण्याची संचालक मंडळाची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

कारखान्याचे संचालक के. डी. सोनवणे, विकास कोंडे, शिवाजीराव कोंडे, दिनकर धरपाळे, प्रताप शिळीमकर, उत्तम थोपटे, सोमनाथ वचकल, अशोक शेलार, शोभा जाधव, सुरेखा निगडे, दिनकर चव्हाण, सुभाष कोंढाळकर, संदीप नगिणे, सुधीर खोपडे, कार्यकारी संचालक सुनील महिंद यांच्यासह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT