Sunil Shelke, Rajnath Singh & Shrirang Barne
Sunil Shelke, Rajnath Singh & Shrirang Barne  Sarkarnama
पुणे

मावळातील प्रलबिंत प्रश्नी आमदार शेळके दिल्लीत तळ ठोकून...

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : मावळ (जि. पुणे) (Maval) तालुक्यातील प्रलंबित प्रश्नी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) स्थानिक आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी नुकत्याच झालेल्या राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जोरदार बॅटिंग केली होती. त्यानंतर मतदारसंघातील केंद्र सरकारशी (Central Government) निगडीत प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आता त्यांनी दिल्ली गाठली आहे. दोन दिवसांपासून (ता.२९ मार्च) ते त्यासाठी सबंधित मंत्र्यांच्या भेटी घेत आहेत. त्यासाठी त्यांना त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि मावळचे शिवसेना (Shivsena) खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांची मदत झाली आहे.

आमदार शेळके हे परवा (ता.२९ मार्च) दिल्लीला गेले. तेथे त्यांनी मावळ तालुक्यातील केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱी आणि अनेक वर्षांपासून रखडलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी खासदार बारणेंसह बुधवारी (दि. ३० मार्च) केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह, केंद्रीय पर्यावरणमंत्री भुपेंद्र यादव व शरद पवार यांची भेट घेतली. प्रथमच आमदार झालेल्या शेळकेंनी आतापर्यंतच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात मावळातील मूलभुत व पायाभूत सुविधांसाठी सुमारे नऊशे कोटी रुपयांचा निधी आणला आहे. तालुक्यातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या किचकट प्रश्नांमध्ये लक्ष घालून ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु आहे. मावळातील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रस्ते, वनविभाग तसेच देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील विकासकामांच्या परवानग्या मिळविण्यासाठी सध्या ते दिल्लीत आहेत.

देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील ऐतिहासिक धम्मभुमीच्या जिर्णोद्धाराच्या कामास संरक्षण विभागाकडून परवानगी मिळावी, तेथीलच सिद्धीविनायक नगरीच्या मंजूर पाणीपुरवठा योजनेस संरक्षण विभागाकडून 'ना हरकत' मिळावी, श्री क्षेत्र देहू ते निगडी पालखी मार्गावर संरक्षण विभागाच्या हद्दीतील रस्ता रुंदीकरणास मंजुरी मिळावी, अशा मागण्या शेळकेंनी संरक्षणमंत्र्यांना केल्या. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर होणारी वाहतुक कोंडी व वाढते अपघात टाळण्यासाठी सेंट्रल चौक, देहुरोड, सोमाटणे फाटा, लिंब फाटा तळेगाव, वडगाव, कान्हे, कार्ला या ठिकाणी उड्डाणपूलांची उभारणी होणे गरजेचे असल्याकडे त्यांनी गडकरींचे लक्ष वेधले. त्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडुन केंद्र सरकारकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावावर पुढील कार्यवाहीचा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावरुन देण्याची मागणी त्यांनी केली. तर, मावळ तालुक्यातील एमआयडीसी टप्पा क्रमांक ४ मधील कल्हाट, निगडे ही गावे इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळावीत, यासाठी राज्य शासनाकडून १३ डिसेंबर २०२१ रोजी केंद्रीय पर्यावरण विभागाकडे पाठविण्यात आलेला प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी त्यांनी मंत्री यादव यांच्याकडे केली आहे.

आपल्या मागण्यांना मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून कार्यवाहीचे आदेशही त्यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे शेळकेंनी दिल्लीहून 'सरकारनामा'ला सांगितले. यामुळे केंद्र सरकार व त्यातही केंद्रीय पर्यावरण विभागाच्या मंजुरीअभावी गेल्या कित्येक वर्षापासून अडलेले मावळातील विकासप्रकल्प आता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिल्ली दौऱ्यात शेळकेंनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन मतदारसंघाचा आढावा व दिल्ली येथे पाठपुरावा सुरू असलेल्या कामांची माहिती त्यांना दिली. या प्रलंबित कामांचे गांभीर्य समजून घेऊन पवार यांनी त्वरित संबंधित मंत्र्यांना पत्रं दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT