Shrirang Barne, Sunil Shelke News Sarkarnama
पुणे

Maval News : महायुतीतच जुंपली ; आमदार शेळके खासदार बारणेंवर बरसले

Sunil Shelke News : महायुतीच्या राज्य सरकारमध्येच नाही, तर त्यांच्या स्थानिक लोकप्रतिनिधींतही सारेकाही आलबेल नसल्याचे आता दिसून आले आहे.

उत्तम कुटे

Pimpri-Chinchwad News : महायुतीच्या राज्य सरकारमध्येच नाही, तर त्यांच्या स्थानिक लोकप्रतिनिधींतही सारेकाही आलबेल नसल्याचे आता दिसून आले आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे कार्यक्षम सीओ विजय सरनाईक यांची टर्म पूर्ण व्हायच्या आत बदली करून त्यांच्याजागी अकार्यक्षम एन. के. पाटील यांना आणल्याबद्दल स्थानिक आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) सुनील शेळके हे मावळचे शिवसेना (शिंदे) खासदार श्रीरंग बारणेंवर (Shrirang Barne) आज भडकले.

नगरपरिषदेचा बट्ट्याबोळ करुन जनतेला वेठीस धरणारे आज घरात बसलेत, असा हल्लाबोल त्यांनी बारणेंवर केला. त्यातून राज्यातील सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीमध्ये (NCP) मावळात स्फोट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील पाच महिन्यांपासून म्हणजे पाटील हे तळेगाव नगरपरिषदेतआल्यापासून त्यांच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. कचरा, स्वच्छता, पाणी पुरवठ्यावरुन ते त्रस्त आहेत. त्यामुळे पाटील यांना उपरोधाने कार्यक्षम अधिकारी असे संबोधून शेळके यांनी गेल्या महिन्यात १० तारखेला त्यांच्या बदलीची मागणी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली होती.

मात्र, त्याची दखल न घेण्यात आल्याने शेळकेंनी (Sunil Shelke) आज सीओंसह त्यांना आणणारे बारणेंवर हल्लाबोल केला. पाटील यांच्यावर कार्यपद्धतीवर नागरिकांची तीव्र नाराजी असून त्यांना, मात्र जनतेच्या मुलभूत प्रश्नांविषयी कुठलेही गांभीर्य नाही, अशी तोफ त्यांनी डागली. सरनाईक यांचा फक्त एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. दोन वर्षे तो शिल्लक असताना काहींनी स्वतःसाठी आणलेले पाटील हे तळेगाव शहरातील कचरा, रस्ता, पाणी असा एकही प्रश्न सोडवू शकले नाही. कारण त्यांना फक्त टक्केवारीत रस आहे का ? असा खोचक सवाल शेळकेंनी केला.

मागील तीन वर्षात शहराच्या विकासासाठी मी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केला. असे असूनही रस्त्यांची कामे जाणीवपूर्वक बंद ठेवली. नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचे बिल ठेकेदाराला दिले नाही. मुख्याधिकाऱ्यांकडून कसलाही पाठपुरावा केला जात नाही. नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर अनेक सीओ आले. सरनाईकांसारख्या चांगल्या अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक राजकारण करून पाटलांसारख्या भ्रष्ट सीओला कुणी आणले. ज्यांनी असा अकार्यक्षम मुख्याधिकारी शहरात आणला ते बारणे तळेगावच्या सध्याच्या परिस्थितीची जबाबदारी न घेता घरात बसलेत. असा थेट घणाघाती आरोप शेळकेंनी केला.

सध्या तळेगावातील पाणीपुरवठा विस्कळीत आहे. कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले जात नाही. कर भरुनही मूलभूत सुविधांपासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांनी मोठ्या संख्येने आपल्या समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी तक्रार शेळकेंकडे केली. त्याचा आदर करीत त्यांनी आज रुद्रावतारच धारण केला. त्याचबरोबर शहरातील गलिच्छ राजकारण थांबावे म्हणून जनतेनेही साथ आवश्यक असल्याची अपेक्षा व्यक्त केली.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT