Pune News : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर जाण्यासाठी राजकीय नेत्यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून उमेदवारी अर्ज खरेदी करण्यासाठी दिग्गजांनी गर्दी केली असतानाच आता सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यभरात गाजलेल्या भोंदूबाबा 'कॅप्टन' अशोक खरात प्रकरणातील एक वादग्रस्त नेत्याने विधान परिषदेचा अर्ज नेल्याचे समोर आले आहे.
'कॅप्टन' अशोक खरात प्रकरणात आणि ५ कोटींच्या खंडणी नाट्यात थेट एसआयटीच्या रडारवर आलेले पुण्याचे बडे व्यावसायिक आणि शिरूरचे राजकीय नेते राजेंद्र जासूद यांनी थेट सुनेत्रा पवार नेतृत्तव करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज नेला आहे.
जासूद यांच्या या धक्कादायक एन्ट्रीने महायुतीसह पुण्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, पक्षांतर्गत सस्पेन्स कमालीचा वाढला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोन दिवस बाकी असताना जासूद यांनी थेट राष्ट्रवादीकडून अर्ज नेल्याने हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अंतर्गत प्लॅन आहे की जासूद यांची स्वतःची चाचपणी, यावर आता तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
अशोक खरात आणि राजेंद्र जासूद यांनी एकमेकांना विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. जासूद यांनी नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात अशोक खरात विरोधात फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. खरातने मृत्यूची भीती दाखवून आणि मंत्रोच्चाराचा आव आणत रिमोटवर चालणारा नकली साप समोर आणून अंधश्रद्धेच्या आधारे कोट्यवधींची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप जासूद यांनी केला आहे.
खरातने पूजेच्या नावाखाली मर्सिडीज कार घेतली, तसेच 21 देशांमध्ये फिरण्यासाठी पैसे उकळल्याचा आरोपही जासूद यांनी तक्रारीत केला आहे. जासूद यांच्या आरोपावरून खरातवर दाखल झालेला हा १० वा गुन्हा होता.
डिसेंबर २०२५ मध्ये नाशिक ग्रामीणच्या वावी पोलीस ठाण्यात अशोक खरातने राजेंद्र जासूद आणि मुंबईच्या दिनेश परब यांच्या विरोधात फिर्याद दिली होती. खरातच्या दाव्यानुसार, दिनेश परब याने त्याच्याशी संपर्क साधून "पुण्यातील राजेंद्र जासूद यांच्याकडे तुमचे काही महिलांसोबतचे आक्षेपार्ह फोटो आहेत आणि ते व्हायरल करून समाजात बदनामी करू," अशी धमकी दिली होती. हे प्रकरण दाबण्यासाठी संशयितांनी खरातकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप खरातने केला होता. या ५ कोटींच्या खंडणी प्रकरणात अडकलेले राजेंद्र जासूद यांना मार्च २०२६ मध्ये नाशिक सत्र न्यायालयाकडून सशर्त तात्पुरता जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान, आता जासूद यांचं नाव विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी चर्चेत आल्याने आता राष्ट्रवादीला ही जागा सुटली असतात नेमकी कोणाची वर्णी उमेदवारीसाठी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.