Vasant More in Iftar Party
Vasant More in Iftar Party  Sarkarnama
पुणे

राज ठाकरे पुण्यात अन् मनसेचे नेते वसंत मोरे इफ्तार पार्टीत!

सरकारनामा ब्युरो

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादमध्ये 1 मे रोजी होणाऱ्या सभेमुळं राजकीय वातावरण तापलं आहे. औरंगाबादला जाण्याआधी राज ठाकरे पुण्यात आले आहेत. पुण्यात शंभर पुरोहितांकडूम मंत्रपठण आणि गाड्यांवर फुलांचा वर्षाव असं त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. पण यात मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) हे कुठेच न दिसल्याने चर्चांना उधाण आले होतं. यातच मोरेंनी इफ्तार पार्टीला हजेरी लावल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

राज ठाकरेंच्या मुंबई आणि ठाण्यातील सभांना हजेरी लावणारे वसंत मोरे मात्र त्यांच्या पुणे दौऱ्यात गायब आहेत. त्यांच्या गैरहजेरीमुळे पुन्हा राजकीय चर्चा रंगली आहे. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना शहरातील सर्व पदाधिकारी हजर असतात. औरंगाबादला जाण्यापूर्वीही ठाकरे पुण्यात आले आहेत. या दौऱ्यात शंभर पुरोहितांकडून मंत्रपठण आणि काही धार्मिक विधी झाले आहेत. मात्र, राज ठाकरे आल्यापासून वसंत मोरे हे कुणालाही दिसले नाहीत. आता खुद्द वसंत मोरेंनीच इफ्तार पार्टीचे फोटो शेअर करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

वसंत मोरेंनी फेसबुकवर हे फोटो पोस्ट केले आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे की, माझी छोटी बहीण आणि जनता वसाहतमधील नागरिकांची कोरोना काळात सेवा करत असताना कोरोना होऊन तरुणपणात दगावलेलेले संपूर्ण जनता वसाहातचे हमीदसर यांची पत्नी आणी पर्वती विधानसभा मतदार संघाची महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेची उपविभाग अध्यक्ष नाज हमीद इनामदारही जरा एकटी पडली होती. पोरगी खूप छान काम करते. म्हणून तिच्या भागात इफ्तारसाठी गेलो होतो, खूप खूश झाली. पोरगी गरीब आहे पण स्वत: शिक्षिका असून, संपूर्ण कुटुंब उच्चशिक्षित आहे. भविष्यात या भागाची लोकप्रतिनिधी नक्की होऊ शकेल.

राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यातील भाषणानंतर मोरेंनी त्यांच्या प्रभागातील मशिदींमसोर भोंगे लावणार नाही,अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांच्यावर राज ठाकरे नाराज असल्याची चर्चा रंगली होती. यामुळे मोरे आता मनसेतून बाहेर पडतील, अशीही शक्यता वर्तविली जात होती. मात्र, यानंतर मोरेंनी शिवतीर्थवर जाऊन राज यांची भेट घेतली आणि आपण शंभर टक्के समाधानी झाल्याचे सांगितले होते. यानंतर या सगळ्या वादावर पडदा पडला होता.त्यानंतर झालेल्या ठाण्याच्या सभेचं निमंत्रण राज ठाकरेंनी वसंत मोरेंना दिलं होतं. या सभेत वसंत मोरेंनाही सर्वांत आधी भाषण करण्याची संधी मिळाली होती.

मनसेच्या पुणे शहराध्यक्ष पदावरुन दूर केल्यानंतर वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार याची पुण्यातील त्यांच्या समर्थकांसह राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांच्यासोबत मनसेचे नवे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि इतर काही पदाधिकारी उपस्थित होते. मोरे यांनी सुरवातीला शर्मिला ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांच्याशी काही काळ चर्चा केल्यानंतर ते राज ठाकरेंना भेटले. मोरे हे मनसे सोडून इतर पक्षात जातील, अशी चर्चा सुरू होती. याबद्दल या भेटीनंतर विचारताच मोरेंनी सगळ्या ऑफर संपल्याचे सांगितले. यामुळे ते मनसेतच राहणार असल्याचे त्यावेळी स्पष्ट झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT