MNS Vasant More Latest Marathi News
MNS Vasant More Latest Marathi News Sarkarnama
पुणे

आधी शहराध्यक्षपद काढलं अन् आता..! 'मनसे'चा वसंत मोरेंना पुन्हा धक्का

सरकारनामा ब्युरो

पुणे : मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मनसेप्रमख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या निर्णयानंतर नगरसेवक वसंत मोरे यांनी उघडपणे विरोध केला होता. त्यानंतर त्यांना तडकाफडकी पक्षाच्या शहराध्यक्षपदावरून हटवण्यात आलं. तेव्हापासून वसंत मोरे हे पक्षात एकाकी पडल्याचे चित्र आहे. रविवारी पुन्हा एकदा मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांना धक्का दिला. (MNS Vasant More Latest Marathi News)

भोंग्यांच्या राजकारणावरून मनसेतच मतभेद निर्माण झाले असून मोरे यांच्या रूपाने पहिला राजकीय बळी गेला आहे. त्यानंतर राज्यातील काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. मोरे यांच्या भूमिकेवरूनही वाद निर्माण झाला. त्यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आल्यानंतर त्यांना सातत्याने डावलेले जात असल्याचा आरोप खुद्द त्यांनीच केला आहे. (MNS Leader Vasant More not invited for party core committee meeting)

पक्षाचे नवे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नियुक्तीनंतर रविवारी पहिल्यांदाच कार्यकारिणीची बैठक होत आहे. पण या बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेतूनच मोरे यांचे नाव वगळण्यात आल्याने पुन्हा वाद वाढला आहे. कोअर कमिटीमध्ये एकूण 11 सदस्य असून त्यापैकी मोरे हे एक आहेत. पण कार्यक्रम पत्रिकेत मोरे यांना वगळून दहा जणांची नावे घेण्यात आली आहेत.

वसंत मोरे यांनाही ही बाब खटकली असून ते म्हणाले, रात्री उशीरा व्हॉट्स अॅपवरून मला कार्यक्रम पत्रिका आली. कार्यक्रम पत्रिकेत दहा जणांची नावं आहेत. प्रत्येकाला विषय दिला आहे. पण माझं नाव नाही. मीही कोअर कमिटीचा सदस्य आहे. पक्षाचा सरचिटणीस आहे. हे जाणीवपूर्वक केलं जात आहे, अशी नाराजी मोरे यांनी व्यक्त केली.

याबाबत शहरातील वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली आहे. राज साहेबांच्या मागे खूप कामं आहेत, असल्या चिल्लर कामांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही, असा टोलाही त्यांनी स्थानिक नेत्यांना लगावला. माझ्या पक्षाची पुण्यात ताकद राहावी हे मला वाटतं पण पक्षात काही पार्ट टाईम काम करणाऱ्यांना ते वाटत नाही, अशी टीका वसंत मोरे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT