MNS activists join Congress party
MNS activists join Congress party Sarkarnama
पुणे

राष्ट्रवादीने नेते पळविताच काँग्रेसने मनसेचे पदाधिकारी फोडले!

सरकारनामा ब्यूरो

पुणे : मावळ (Maval) तालुक्यातील लोणावळा आणि देहूरोड येथील काँग्रेसच्या (congress) नेत्यांनी गुरुवारी (ता. २१ एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला होता. त्यानंतर काँग्रेसने आज (ता. २२ एप्रिल) मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांकडे आपला मोर्चा वळून त्यांना आपल्या पक्षात आणले आहे. त्यातूनच देहूरोड येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) यांनी शहरातील काँग्रेस भवनात त्यांचे स्वागत केले. (MNS office bearers and activists joined Congress party)

असिफ इसा सय्यद, हसन शेख, जावेद शेख, हुसेन शेख, जेदिन नाडार, सूरज गायकवाड, अजय बाला, संकेत गायकवाड, आकाश सुतार, अजय रामोशी, रवी स्वामी, शरद सोनी व माजी पोलिस अधिकारी आबूबकार लांडगे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आगामी काळात देहूरोड परिसरात काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळातील जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचा निश्चय केला, असे या काँग्रेस प्रवेशानंतर सांगितले.

या मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे स्वागत करताना आमदार संजय जगताप म्हणाले की, काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीमध्ये एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून आघाडीतील इतर दोन पक्षाला कधीही दुखावण्याचा प्रयत्न केला नाही किंवा भविष्यातदेखील आम्ही कधीही तो प्रयत्न करणार नाही. सध्या वर्तमानपत्रातून मावळ परिसरातील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी इतर पक्षांमध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांत सातत्याने येत आहेत. या निमित्ताने मला मित्र पक्षाला सांगायचे आहे की, काँग्रेस पक्षाला अनेकांनी संपवण्याचा प्रयत्न केला. पण, तो कधीही संपला नाही; कारण काँग्रेस जनसामान्यांची मजबूत विचारधारा आहे.

देहूरोड, लोणावळा, मावळ या ठिकाणी आजही काँग्रेस पक्ष अतिशय सक्षम आहे. या ठिकाणच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अशा प्रकारच्या कोणत्याही वाऱ्या वादळाचा काहीही फरक पडणार नाही. जे आता काँग्रेस पक्षातून दुसरीकडे गेले आहेत, ते काँग्रेस पक्षात किती दिवस होते, याचादेखील अभ्यास करावा, असे जगताप म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT