Vasant More | Raj Thackeray
Vasant More | Raj Thackeray 
पुणे

Vasant More : वसंत मोरेंबाबत मनसे अॅक्शन मोडवर; दोन दिवसात घेणार निर्णय...

सरकारनामा ब्यूरो

Vasant More : पुण्यातील मनसे नेते आणि माजी शहराध्यक्ष वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी त्यांनी स्वत: माध्यमांसमोर ही नाराजी बोलून दाखवली. त्यातच राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खुली ऑफर दिल्यानंतर तर त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या शक्यताही वर्तवण्यात येत आहेत.

अशात वसंत मोरे यांच्याशी माध्यमांनी पुन्हा संवाद साधला असता त्यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी बोलून दाखवली. पक्षात माझ्या बाबत ज्या काही घटना घडत आहे, त्याला बाबू वागसकर हेच जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला. पण असे असले तरी मी आजही अध्यक्ष राज ठाकरें यांच्यासोबतच असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (७ डिसेंबर) पुण्यातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात एक बैठक पार पडली. या बैठकीला मनसेचे नेते बाबू वागसकर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर बाबू वागसकर यांना मोरे यांच्या नाराजीबाबत विचारण्यात आले. याबाबत बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वसंत मोरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाबद्द्लची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असली तरी या मुद्द्यावर पक्षाच्या बैठकीत चर्चा झाली नाही, पण येत्या दोन दिवसात याबाबच सविस्तर खुलासा केला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तसेच, आठवड्याभरात कोणती कामं करायची त्याबाबत आजची बैठक झाली. पुणे महापालिकेने शहरी गरीब योजना बंद केली. करदात्यांना ४० टक्के सवलत मिळावी, यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली होती, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. या दोन विषयावर आजच्या बैठकीत चर्चा झाली असून आम्ही लवकरच आंदोलन करणार असल्याचेही वागसकर यांनी सांगितले.

दरम्यान, वसंत मोरे (Vasant More) यांनी आतापर्यंत अनेक वेळा पक्षाच्या शहर कोअर कमिटीच्या कार्यपद्धतीवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याच्याही चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात सुरु होत्या. असे असतानाच शहरातील एका विवाह सोहळ्यात वसंत मोरे यांनी हजेरी लावली होती. त्याच सोहळ्याला अजित पवार यांच्यासह त्यांचे कार्यकर्तेही आले होते. दोघांनीही एकमेकांना नमस्कार करत एकमेकांशी हस्तांदोलन केले. त्याच वेळी अजित पवार यांनी ‘तात्या कधी येताय, मी वाट पाहतोय’ अशी खुली ऑफरच वसंत मोरे यांना देऊन टाकली. त्यामुळे पुन्हा एकदा वसंत मोरे मनसेमध्ये थांबणार की राष्ट्रवादीमध्ये जाणार या चर्चांना सुरुवात झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT