Pune Metro News : केंद्र सरकारने पुण्यातील दोन नवीन मेट्रो मार्गिकांना मंजुरी दिली आहे. यात खराडी-खडकवासला (मार्गिका ४) आणि नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग (मार्गिका 4अ) मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये तब्बल 9 हजार 857 कोटींची तरतूद असून, पुढील 5 वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी दिली.
याबाबत केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनीही ट्विट करून माहिती दिली आहे. पुणे मेट्रो रेल नेटवर्कच्या फेज-2 अंतर्गत लाइन 4 (खडकी–खडकवासला) आणि लाइन 4अ (नळ स्टॉप–वारजे–माणिक बाग) या दोन्ही मार्गांना मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पामध्ये 9,857.85 कोटींची तरतूद असून, पुढील 5 वर्षांत हे काम पूर्ण होणार आहे.
या विस्तारामुळे 31.6 किमीचे नवे नेटवर्क, 28 एलिव्हेटेड स्टेशन तयार होतील ज्यामुळे IT हब, व्यावसायिक परिसर, कॉलेजेस आणि प्रमुख निवासी भागांना अधिक वेगवान कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. नवीन लाईन्समुळे खडकी, नळस्टॉप, वारजे, माणिक बाग आणि डेक्कन–स्वारगेट परिसराला प्रचंड फायदा होणार आहे, असे मोहोळ यांनी म्हंटले आहे. हडपसर रेल्वे स्टेशनवर इंटरचेंज सुविधा उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे प्रवास आणखी सोपा होईल. या विस्तारामुळे खडकी, वारजे, माणिक बाग, नळ स्टॉप तसेच डेक्कन–स्वारगेट परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होईल.
यासोबतच केंद्र सरकारने उद्योग क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशात रेयर अर्थ स्थायी चुंबकांच्या (Rare Earth Permanent Magnets) उत्पादनाला चालना देण्यासाठी 7,280 कोटी रुपयांचा नवा प्रोत्साहन पॅकेज मंजूर करण्यात आला आहे. ‘सिन्टर्ड रेयर अर्थ परमानेंट मॅग्नेट्सच्या उत्पादनाला प्रोत्साहन योजना’ या नावाने ही योजना राबवली जाणार असून दरवर्षी 6,000 मेट्रिक टन उत्पादन क्षमता विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली.
या सर्व निर्णयांमुळे उद्योग, वाहतूक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुणे शहरासाठी ही मंजुरी एक सकारात्मक पाऊल मानली जात आहे. केंद्राच्या या दुहेरी निर्णयामुळे तंत्रज्ञान विकासासह पायाभूत सुविधांच्या विस्तारालाही मोठी चालना मिळणार असून पुणेकरांसाठी ही खरोखरच आनंदाची बातमी ठरली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.