Amol Kolhe
Amol Kolhe Sarkarnama
पुणे

चाकण वाहतूक कोंडीबाबत खासदार अमोल कोल्हे झाले सक्रिय

सरकारनामा ब्यूरो

चाकण : आगामी दिवाळीच्या काळात होणारी चाकण चौकातील वाहतूक कोंडी (Traffic jam) लक्षात घेऊन किमान १५ दिवसांसाठी सकाळी ७ ते १० आणि संध्याकाळी ४ ते ९ यावेळेत कन्टेनर आदी जड वाहनांच्या वाहतूक बंद ठेवण्यासह विविध उपाययोजना करण्याचे निर्देश खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी वाहतूक पोलीस प्रशासनास (Traffic Police) दिले.

चाकण चौकातील वाहतूक कोंडी हा गेल्या काही वर्षांपासून अतिशय कळीचा मुद्दा ठरला आहे. मागील लोकसभा निवडणूक बऱ्याच अंशी याच प्रश्नाभोवती फिरली होती. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांनंतर मोशी (इंद्रायणी नदी) ते चांडोली या टप्प्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून निविदा प्रक्रियाही पार पडली आहे. मात्र, तांत्रिक बाबींची पूर्तता होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन आगामी दिवाळीच्या काळात वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी शुक्रवारी (दि.२९ऑक्टोबर) चाकण वाहतूक विभाग, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांची बैठक घेतली.

या बैठकीत खासदार डॉ. कोल्हे यांनी नागरिकांना दिवाळीच्या काळात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी कन्टेनरसह सर्व जड वाहनांची वाहतूक सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ४ ते ९ यावेळेत बंद ठेवावी. तसेच, तळेगाव चौकातील एस.टी, पीएमटी व खासगी बसेसचे थांबे १०० मीटर पुढे नेण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे चौकात उभ्या राहणाऱ्या सहा आसनी रिक्षा व इतर वाहनांना चौकापासून १०० मीटर हद्दीपर्यंत पार्किंग करण्यास मज्जाव करावा. तसेच, वाहतूक नियंत्रण करण्यासाठी मनुष्यबळ वाढवावे अशा सूचना दिल्या.

तळेगाव चौकाच्या चारही बाजूला रस्त्याला पडलेले खड्डे बुजविल्यास वाहनांना डावीकडे वळण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होईल, असे सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी डॉ. कोल्हे यांना सुचवताच त्यांनी सार्वजनिक बांधकाम (नॅशनल हायवे विभाग) आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या दोन्ही यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करुन चौकातील वळणावरचे खड्डे तत्काळ बुजविण्याचे निर्देश दिले.

या बैठकीला सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, मुख्याधिकारी नानासाहेब कामठे, चाकण वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, पोलीस निरीक्षक शिनगारे, राम गोरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT