MP Amol Kolhe  Sarkarnama
पुणे

आता लवकरच रिचार्ज होतोय...मतदारसंघात भेटीला येतोय!

शिरूर लोकसभा मतदारसंघात लवकरच संपर्क दौरा सुरू करणार

डी. के. वळसे पाटील

मंचर (जि. पुणे) : मला कोविडची लागण झाली होती, त्यामुळे माझी बॅटरी डिस्चार्ज झाली होती. आत्ता थोड बरं वाटतंय. पण, बॅटरी पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दौरा सुरू करणार आहे. मतदारसंघात संपर्क अभियान प्रभावीपणे राबवून तुमच्या भेटीला येणार आहे, असे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जाहीर केले. (MP Amol Kolhe soon start to tour in Shirur Lok Sabha constituency )

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ. कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पाच लाख नागरिकांना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ शनिवारी (ता. २ आक्टोबर) झाला. त्यावेळी खासदार कोल्हे बोलत होते.

अमोल कोल्हे म्हणाले की, मी कोविड प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतले होते. लस घेतल्यामुळे फार त्रास होत नाही. प्रतिकारशक्ती तयार होते, त्यामुळे नागरिकांनी लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी व्हावे. शिरूर लोकसभा मतदार संघातील दौऱ्याचे नियोजन केले होते. पण, मी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे नाईलाजाने मला दौरे रद्द करावे लागले. पण आता बरं वाटतंय. माझी बॅटरी पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर दौरे सुरू होतीलच. मी बेडवर होतो. पण, विकासकामांबाबत कोठेही कमी पडलो नाही. खेड तालुक्यात इंद्रायणी मेडिसिन अंतर्गत मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल उभारले जाईल. या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक प्रतीची सेवा रुग्णांना मिळणार आहे. सर्व प्रकारचे उपचार व शस्त्रक्रिया येथे होतील. सर्व शासकीय योजनांचा लाभ रुग्णांना मिळेल. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिले होते.

या पत्राला त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासमोर प्रेझेंटेशन लवकरच सादर करणार आहे. या हॉस्पिटलचा डीपीआर तयार करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियोजन मंडळातून दहा लाख रुपये निधी मंजूर केला आहे.

गेल्या दोन वर्षात शिरूर लोकसभा मतदारसंघात 27 हजार कोटी रुपयांची विकासकामे आणली आहेत. पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गासाठी अंतिम मंजुरी व गतिमान कामकाजासाठी कार्यक्षेत्रातील सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनाही भेटणार आहे.

या प्रसंगी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, संचालक प्रदीप वळसे-पाटील, सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, जिल्हा परिषद सदस्य अरुणा थोरात, सुषमा शिंदे, उषा कानडे, दत्ता थोरात, सुहास बाणखेले अंकित जाधव, लक्ष्मण थोरात, संजय बाणखेले, बाजीराव मोरडे, प्रवीण मोरडे, विजय थोरात, सुरेश निघोट आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT