Sharad Pawar, Girish Bapat
Sharad Pawar, Girish Bapat sarkarnama
पुणे

'त्यांना' बारामतीला विमानतळ बांधू द्या, पण पुण्याचे विमानतळ हलविणार नाही!

सरकारनामा ब्युरो

पुणे : ''पुणे जिल्ह्यातील नियोजित विमानतळासंदर्भात या पंधरवड्यात संबंधितांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लागेल,'' असे तीन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी पवारांना टोला लगावला आहे. ''कोणाला कितीही विमानतळे बांधायची आहेत, ती त्यांनी बांधावीत, पण लोहगाव विमानतळ हलविणार नाही,'' असे म्हणत पवारांचे नाव न घेता बापटांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

''पुण्यातील लोहगाव विमानतळाचे स्थलांतर करणार नाही, येथेच सुविधा वाढविणार,'' असे विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष गिरीश बापट यांनी आज सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ''पुरंदरला विमानतळ झाले तरी लोहगाव विमानतळ कायम राहणार,' असेही त्यांनी सांगितले. बापट यांनी आज लोहगाव विमानतळाची पाहणी केली.

''विमानतळ कोणाला सुप्याला बांधायचे आहे, कोणाला बारामतीला बांधायचे आहे, त्यांना बांधू द्या. पण सर्व सोयींच्या कारणामुळे लोहगाव विमानतळ हलवणार नाही, असे बापट यांनी स्पष्ट केले. ''पुणेकरांना जिथे सोयीचे आहे, तिथेच विमानतळ राहणार,''असे बापट म्हणाले.

''विमान तळासंदर्भात जागा निश्चित झाल्या, पण संरक्षण खात्याने हरकत घेतली. त्यामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. पुढील पंधरा दिवसात मी स्वतः, खासदार सुप्रिया सुळे आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी मिळून संरक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार आहोत,'' असे पवारांनी तीन दिवसापूर्वी सुपे येथील कार्यक्रमात सांगितले होते.

''संरक्षण खात्याचा पुण्यात विभाग आहे. त्यांची विमाने रोज सकाळी सरावासाठी या भागातून जात असतात. संरक्षण खात्याची भूमिका काय आहे हे समजून घ्यावी लागेल. आणि त्यानंतरच विमानतळासंदर्भातील मार्ग काढला जाईल,'' असे पवार म्हणाले. पुणे जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील विमानतळ नेमके कोठे होणार हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यात आहे. विमानतळ चाकणला होणार का पुरंदर तालुक्यात होणार याबाबत जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा चालू आहे.

पूर्वनियोजनानुसार हे विमानतळ खेड तालुक्यात होणार होते. परंतु तेथील स्थानिकांनी विमानतळासाठी आवश्‍यक असणारी जागा देण्यास नकार दिला. या विमानतळाला आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र विरोध केला. त्यामुळे सरकारने या विमानतळाची जागा बदलण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार हेच विमानतळ पुरंदर तालुक्यात हलविले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावित विमानतळाचे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरणही जाहीर केले आहे.

खेड तालुक्यातील शेतकऱ्यांप्रमाणेच पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनीही या विमानतळाला जमिनी देण्यास प्रथमपासून तीव्र विरोध सुरु केला आहे. या विरोधामुळे तेथील जागेबाबत तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. ही अडचण दूर करण्यासाठी काही अंशी जागा बदलण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिला होता. परंतु हा प्रस्ताव तांत्रिक अडचणीमुळे अद्याप मंजूर होऊ शकला नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित विमानतळ जागेअभावी होणार की नाही, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT