Pune News : लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाची विचारधार आणि भूमिकेशी ठाम राहून एकजुटीने लढा देत यश मिळविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे आभार मानले आहेत.
संसदेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आवाज बुलंद होण्यासाठी पक्षाच्या प्रत्येक सेलच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत पक्षाकडे माहिती पाठवावी, असे आवाहन सुळे यांनी केले आहे.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी हे पत्र आपल्या एक्स वर टाकले आहे. त्यामध्ये सुळे म्हणतात की, नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण मायबाप जनतेची सेवा, कष्टकरी, कामगार, शेतकरी आणि महिलांचा सन्मान तसेच महाराष्ट्राचा स्वाभिमान अबाधित राखण्यासाठी या संघर्षात सर्वस्व विसरुन सहभागी झाला.
आपल्या सहभागामुळे आदरणीय पवार साहेबांनी सुरु केलेल्या या लढाईला एका लोकसंग्रामाचे स्वरुप प्राप्त झाले. यामुळेच संसदेत आपले आठ खासदार आपणा सर्वांचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण पाठविले. आपण सर्वांनी मिळून केलेल्या या कामगिरीचा मला सार्थ अभिमान आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांचा 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या विचारांचा वारसा जोपासत आपण जनसेवेच्या मार्गाने चालत आहोत. यामध्ये कोणत्याही घटकावर अन्याय होऊ नये अशी आपणा सर्वांचीच प्रामाणिक इच्छा आहे. म्हणूनच राज्यातील कानाकोपऱ्यात अगदी 'चांदा ते बांदा' पर्यंतच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एक उपक्रम आपल्याला राबवायचा आहे. आपल्या माध्यमातून संसदेत (Parliament) निवडून गेलेले आपल्या पक्षाचे सर्व खासदार जनहिताचे प्रश्न संसदेत मांडतील.
सत्ताधाऱ्यांना जनहिताचे प्रश्न विचारण्यासाठी प्रत्येक सेलच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे.यासाठी पक्षाच्या प्रत्येक सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाने अधिकृतरित्या तयार केलेल्या ncpspinparliment@gmail.com या ईमेल आयडीवर घडलेल्या घटनांचा सारांश आणि त्याचे प्रमुख पुरावे (कागदपत्रे, फोटो, व्हिडिओ, ऑडीओ,) जोडून पाठवावे. संसदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचा आवाज बुलंद होण्यासाठी यामध्ये हातभार लावावा, असे आवाहन सुळे यांनी कार्यकर्त्यांना पाठविलेल्या पत्रात केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.