Aaditya Thackeray Sarkarnama
पुणे

MPSC Protest Pune : MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; आदित्य ठाकरेंचा आयोगाध्यक्षांवर हल्लाबोल, राहुल गांधींची चर्चा

MPSC students protest in Pune enters its fifth day as political support grows, with Aaditya Thackeray backing the agitation : पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; आदित्य ठाकरे उद्या आंदोलनात सहभागी होणार, राहुल गांधींना सहभागी होण्याचे आवाहन

Pradeep Pendhare

Aaditya Thackeray MPSC protest : पुण्यात MPSCच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून, आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे सरकार आणि MPSC आयोगाने तातडीने लक्ष द्यावे, यासाठी विविध राजकीय नेतेही आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचत आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार संजय राऊत, विजय वडेट्टीवार यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या आंदोलनाची दखल घेतली आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे देखील आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी रवाना झाल्याची माहिती आहे. आदित्य ठाकरे यांनी देखील आंदोलक विद्यार्थ्यांना, मी उद्या पुण्यात येत असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, बळ वाढवले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) नेते आणि युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनीही MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी MPSC आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्यावर थेट निशाणा साधला.

आदित्य ठाकरे यांनी आयोगाध्यक्षांना उद्देशून म्हटले, "अहो, MPSCचे अध्यक्ष महाशय, हजारो-लाखो विद्यार्थी तुम्हाला नाकारताहेत. बाजूला व्हा, सांगताहेत! गद्दार ज्ञानेशकडून धडे घेतले का आपण? की आता विद्यार्थ्यांनी येऊन बसायचं MPSCच्या दारात आणि मगच आपण राजीनामा द्याल?"

याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी आपण स्वतः पुण्यातील MPSC आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. "उद्या मी पुण्यात MPSCच्या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसोबत जाऊन बसणार आहे," असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आंदोलनाला राजकीय पाठिंबा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आंदोलनात विविध राजकीय आणि सामाजिक नेत्यांचा सहभाग वाढत आहे. सीजेपी उपहासात्मक आंदोलनाचे अध्यक्ष अभिजीत दिपके हे देखील आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

राहुल गांधी आंदोलनात सहभागी होणार?

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात काँग्रेस नेते राहुल गांधी सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 7 किंवा 8 ऑक्टोबरला राहुल गांधी पुण्यात येऊन आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यांच्या सहभागाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. विजय वडेट्टीवार यांनी विद्यार्थ्यांसमोर राहुल गांधी यांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असा प्रस्ताव मांडला. त्यावेळी विद्यार्थ्यांनी मोबाईलचे टॉर्च लावून या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला.

आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

आंदोलनाला मिळत असलेला वाढता राजकीय पाठिंबा आणि विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता, येत्या दिवसांत आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. 7 किंवा 8 ऑक्टोबरला सुमारे एक लाख विद्यार्थी पुण्यात रस्त्यावर उतरण्याचा अंदाज आंदोलनाशी संबंधितांकडून व्यक्त केला जात आहे. आंदोलनातील विद्यार्थ्यांनी मागण्या मान्य न झाल्यास पुणे बंद किंवा मुंबईतील मंत्रालयावर मोर्चा काढण्यासारखी भूमिका घेतली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत विद्यार्थ्यांकडून अधिकृत निर्णय झालेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT