पुणे

महापौर पदावर असताना विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या मुक्ता टिळक पहिल्याच!

ज्ञानेश सावंत

पुणे : महापौर पदावर असताना थेट विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी मिळविणाऱ्या मुक्ता टिळक या पुण्यातील पहिल्याच नेत्या ठरल्या आहेत. 

कसबा विधानसभा मतदारसंघातून टिळक यांना भारतीय जनता पक्षाचे तिकिट मिळाले असून, पक्षाच्या पहिल्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमुळे महापौरपदाची मुदत तीन महिन्यांनी वाढविल्याने टिळक यांना पदावर असताना ही संधी मिळाली आहे.

कसब्यातून टिळक यांच्यासह नगरसेवक गणेश बीडकर, धीरज घाटे, हेमंत रासने हे प्रमुख इच्छुक होते. मात्र, ज्येष्ठ आणि अनुभवी असल्याने उमेदवारीची माळ टिळक यांच्या गळ्यात पडली.

पुणे शहरात आतापर्यंत 56 महापौर झाले आहेत. त्यातील अनेकांनी मंत्री, आमदार, खासदार म्हणून काम पाहिले. मात्र पदावर असतानाच निवडणूक लढविणाऱ्या टिळक या पहिल्याच आहेत. महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता येताच  पक्षाच्या पहिल्या महापौर म्हणून टिळक यांची निवड झाली. हे पद त्यांच्याकडे अडीच वर्षांसाठी होते. त्यानुसार 15 सप्टेंबरला त्यांची मुदत संपली. परंतु, विधानसभा निवडणुकांमुळे पुण्यासह राज्यातील अन्य शहरांच्या महापौरपदाची निवड तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे मुदत संपूनही महापौरपद टिळक यांच्याकडेच राहिले.

पुण्यात महापौर राहिलेले  बाबूराव सणस, नामदेवराव मते, भाई वैद्य, वसंतराव थोरात, भाऊसाहेब शिरोळे, वि. भा. पाटील, चंद्रकांत छाजेड, शिवाजीराव भोसले हे नेते नंतर विधानसभेत आमदार झाले. त्यातील वि. भा. पाटील, शिवाजीराव भोसले हे विधान परिषदेवर आमदार होते. बाळासाहेब शिवरकर हे माजी महापौर दोनदा आमदार झाले होते. काही काळ ते राज्यमंत्रीही होते. दिप्ती चवधरी या विधान परिषदेवर आमदार होत्या. याशिवाय महापौर राहिलेल्या वंदना चव्हाण या राज्यसभेत दुसऱ्यांदा खासदार म्हणून प्रतिनिधित्व करीत आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT