Mulshi Dam  sarkarnama
पुणे

Mulshi Dam Water : मुळशी धरणातून पुण्यासाठी 8 टीएमसी पाणी, CM फडणवीसांच्या बैठकीत मोठा निर्णय

Mulshi Dam Water for Pune : मुळशी धरणातील आठ टीएमसी पाणी पुण्याला देण्याबाबत निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत घेण्यात आले.

ब्रिजमोहन पाटील

ब्रिजमोहन पाटील

Pune News : पुणे वाढणारी शहराची हद्द आणि लोकसंख्या यामुळे भविष्यात उद्भवू शकणारी पाणीटंचाई लक्षात घेता पुणेकरांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे शहरासाठी मुळशी धरणातून ८ टीएमसी पाणी कोटा मंजूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन पुढील दीड ते दोन वर्षांमध्ये हे अतिरिक्त पाणी पुणे शहरासाठी उपलब्ध होणार आहे.

यंदा 'एल निनो'च्या वाढत्या प्रभावामुळे संपूर्ण राज्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून अनेक भागांत पाणीटंचाई जाणवत आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पासह इतर धरणांमधील पाणीसाठा गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे पुणे महापालिकेकडून पाणी बचतीसाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. दुसरीकडे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकामांमुळे लोकसंख्येत मोठी वाढ होत आहे. या संपूर्ण प्रादेशिक भागाला अतिरिक्त पाण्याची नितांत गरज निर्माण झाली होती.

याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुण्याच्या पाणीप्रश्नासंदर्भात विशेष बैठक पार पडली. या बैठकीत मुळशी धरणातून पुण्याला ८ टीएमसी पाणी देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

दोन वर्षांत पाणीपुरवठा

पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आज पुण्याच्या पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये मुळशी धरणातून ८ टीएमसी पाणी कोटा मंजूर करण्यात आला असून पुढील दीड ते दोन वर्षांत हे पाणी पुणे शहरासाठी उपलब्ध होईल. उर्वरित महत्त्वाच्या विषयांवर पुढच्या बैठकीत चर्चा होईल."

महापालिकेला करावी लागणार मोठी तरतूद

मुळशी धरणातून पुणे शहरासाठी आठ टीएमसी पाणी कोटा मंजूर झाल्याचा आदेश दिल्यानंतर हे पाणी पुण्यात आणण्यासाठी मोठी योजना तयार करावी लागणार आहेत. धरणातून पुण्यात पाणी घेऊन येणारी मोठी जलवाहिनी, जॅकवेल, जलशुद्धीकरण केंद्र यासह अन्य कामांसाठी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करावा लागेल. यासाठी मोठ्या निधीची तरतूद करावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT