Phone tapping sarkarnama
पुणे

Phone Tapping : पटोले, बच्चू कडू, संजय काकडे, हे पुण्यात ड्रग्ज रॅकेट चालवत होते..

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिली फोन टॅपिंग प्रकरणाची माहिती..

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), माजी खासदार संजय काकडे, (Sanjay Kakade) माजी आमदार आशिष देशमुख, (Ashish Deshmukh) मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचे फोन अवैधरित्या टॅप केल्याबद्दल पुण्याच्या माजी पोलिस आय़ुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्याविरुद्ध आज पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. साधारणपणे 2017-18 या कालावधीत हे फोन टॅपिंग झाले.

या काळात पटोले यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात टीका करत होते. संजय काकडे हे तेव्हा भाजपमध्येच होते आणि पुणे महापालिकेच्या निवडणुकीत ते पक्षासाठी सक्रिय होते. आशिष देशमुख हे भाजपचे आमदार होते पण पक्षाच्या नेतृत्वावर टीका करत होते. नंतर त्यांनी भाजपचा त्याग केला. बच्चू कडू हे तेव्हा अपक्ष आमदार होते.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या बेकायदा फोन टॅपिंग प्रकरणाची माहिती मुंबईत आज पत्रकार परिषदेत दिली. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक बाबी सांगितल्या. सार्वजनिक सुरक्षा राखण्यासाठी, दहशतवादी कारवाया किंवा शत्रूराष्ट्राशी संधान समजण्यासाठी, अमली पदार्थाचे जाळे, संवेदनशील गुन्ह्यांची उकल अशा प्रकरणात फोन टॅपिंग करता येते. यातील कोणतेही कारण या नेत्यांचे फोन टॅपिंग करताना नव्हते.

रश्मी शुक्ला या पुण्यात आयुक्त म्हणून असताना त्यांनी पुण्यात महाविद्यालयीन तरुणांमध्ये ड्रग्जचे व्यसन मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यासाठी काही रॅकेट सुरू असल्याचे सांगून प्रत्यक्षात नेत्यांचे फोन टॅप केले. हे ड्रग रॅकेट म्हणजे एक आंतरराष्ट्रीय कट असल्याचे त्यांनी भासविले. हा टेलिग्राफ कायद्याचा भंग आहे. त्यामुळे शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे वळसे यांनी स्पष्ट केले.

हे फोन टॅप करण्यासाठी या नेत्यांना कोडनेम देण्यात आलेले होते. त्यात नाना पटोले यांच्या नावासमोर अमजद खान असे लिहून त्यांचे फोन टॅप केले होते. बच्चू कडू यांचे नाव निजामुद्दीन बाबू शेख असे होते. संजय काकडे यांना तरबेज सुतार आणि अभिजित नायर अशी नावे दिली होती. तर आशिष देशमुख यांना रघू चोरघे, महेश साळुंखे अशी नावे दिली होती. हे सारे जण पुण्यात अमली पदार्थ विकतात, असे सांगून परवानगी मिळवली होती. टेलिग्राफ कायद्याच्या बाहेर जाऊन, त्याचा भंग करून शुक्ला यांनी हे कृत्य केले. हे टॅपिंग शुक्ला यांनी कोणासाठी केले आणि त्याचा उपयोग कोणाला झाला, हे पुढील तपासात समजेल, असे वळसे यांनी सांगितले.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रश्मी शुक्ला यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. पुणे पोलिसांनी याबाबत अधिकृतरित्या चार ओळींचे पत्रक काढून त्याची माहिती दिली. पण हे प्रकरण गंभीर असल्याने त्याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला. हे प्रकरण पुणे पोलिसांकडेच राहणार की त्यासाठी विशेष पथक नेमणार, हे पण आता पुढील काही दिवसांत कळेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT