Sharad Pawar, Ravi Rana, Navneet Rana
Sharad Pawar, Ravi Rana, Navneet Rana Sarkarnama
पुणे

हे शोभत नाही! ठाकरे सरकार विरूध्द राणा दाम्पत्य वादावर पवारांनी पहिल्यांदाच केलं भाष्य

सरकारनामा ब्युरो

पुणे : राज्यात शिवसेना विरूध्द राणा दाम्पत्य असा संघर्ष पेटला आहे. दोन दिवसांपूर्वी नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना अटक करण्यात आली आहे. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोमवारी पहिल्यांदाच भाष्य केलं.

माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, बाळासाहेब ठाकरे आणि माझे जाहीर इतके मतभेद असायचे, की आम्ही शब्द वापरण्याची काटकसर कधी केली नाही. पण संध्याकाळी आम्ही एकमेकांच्या घरी जायचो. सभेत काय बोललो, त्याचं स्मरणही कधी व्हायचं नाही. ही परंपरा यशवंतराव चव्हाणांपासून होती. विधीमंडळातही यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री आचार्य अत्रे, एस. एम. जोशी हे विरोधी पक्षाचे नेते होते. विधीमंडळातील चर्चा एकदम टोकाची असायची. पण नंतर राज्याच्या हिताचे विचार होत होते. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. पण दुर्देवाने अलीकडे नाही त्या गोष्टी पाहायला मिळत आहेत.

मुख्यमंत्र्यांवर धोरणात्मक टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण त्यांचं एकेरी नाव घेऊन वेडंवाकडं बोलणं शोभत नाही. मुख्यमंत्री ही एक संस्था आहे. मी उद्धव ठाकरे म्हणून बघत नाही. या संस्थांचा वकूब ठेवला पाहिजे. ते न ठेवण्याची भूमिका काही लोक घेतात. तुम्हाला तुमच्या धार्मिक गोष्टी करायच्या असतील तर तुमच्या निवासस्थानी करू शकता. पण तो कार्यक्रम माझ्या दारात येऊन करणार असाल तर त्याची अस्वस्था माझ्यावर आस्था असणाऱ्या सहकाऱ्यांमध्ये झाली तर त्याला दोष देता येणार नाही. काही दिवसांपासून अशी भूमिका काही लोक घेत आहेत. बघूयात काही दिवसात हे वातावरण आणखी खाली जाईल, अशी अपेक्षा करूया. माझ्यासारख्याची भूमिका ही या राज्यात विद्वेष कसा कसा वाढणार नाही, याची काळजी घेणं ही राहील, असं पवारांनी स्पष्ट केलं.

पवारांचा फडणवीसांना चिमटा

पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टोला लगावला. राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत भाजपच्या (BJP) काही नेत्यांनी भाष्य केलं आहे. त्यावरून पवारांनी आपलीही सत्ता कैकदा गेल्याचे सांगितले. पण सगळेच माझ्यासारखे नसतात. माझी सत्ता गेल्यानंतर सकाळी वानखेडे स्टेडियमवर जाऊन मी मॅच पाहत बसलो होतो. पण काही लोक सत्ता गेल्यानंतर अस्वस्थ होतात, असा चिमटा पवार यांनी काढला.

पुण्यात माध्यमांशी बोलताना पवार यांनी राष्ट्रपती राजवटीच्या चर्चेवर म्हटले की, सत्ता गेल्यानंतर काही लोक अस्वस्थ होतात. सगळे माझ्यासारखे नसतात. माझे सरकार 1980 मध्ये बरखास्त झाले होते. मुख्य सचिवांनी रात्री साडेबारा वाजता मला सांगितलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता मी सरकारची गादी सोडल्यानंतर वानखेडे स्टेडियमवर मॅच बघायला गेलो होतो. त्यादिवशी भारत व इंग्लंडची क्रिकेट मॅच होती. या मॅचचा मी दिवसभर आनंद घेतला.

सत्ता येते आणि जाते. पण त्यामुळे इतकं अस्वस्थ होण्याची गरज नाही. काही लोक खूप अस्वस्थ होतात. निवडणुकीपूर्वी त्यांनी मी येणार, मी येणार अशा घोषणा दिल्या होत्या. पण तसं घडलं नाही. त्यामुळे मी त्यांना दोष देणार नाही, असा टोला पवारांनी लगावला. राष्ट्रपती राजवटीची भीती नेहमीच दाखवली गेली. पण तसं होत नाही. जर निवडणुकीची स्थिती आली तर नुकत्याच कोल्हापूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीने दाखवून दिले आहे की, काय निकाल लागू शकतो, असंही पवार म्हणाले.

फडणवीसांचे केंद्रीय गृह सचिवांना पत्र

हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठणावरून राज्यातील राजकारण चांगलं तापलं आहे. एकीकडे खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे खास पोलीस ठाण्याबाहेर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे भाजपनं (BJP) आक्रमक पवित्रा घेतला आहे. काही नेत्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. तर फडणवीस यांनी थेट केंद्रीय गृह सचिवांना पत्र लिहिलं आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह काही नेत्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी स्थिती निर्माण झाल्याचे वक्तव्य केलं आहे. पण फडणवीस यांनी भाजपनं अशी कुठलीही अधिकृत मागणी केलेली नाही आणि करणारही नाही, असं स्पष्ट केलं आहे. पण सोमय्या यांच्या हल्ल्याच्या विरोधात फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांना पत्र लिहून कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे. तसेच किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्यमंडळानेही भल्ला यांची आज भेट घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT