Sharad Pawar and Rahul Bajaj Sarkarnama
पुणे

जवळच्या मित्राच्या जाण्याने शरद पवार हळहळले; म्हणाले, हमारा बजाज!

बजाज उद्योग समूहाला नव्या उंचीवर नेण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा होता.

सरकारनामा ब्युरो

पुणे : बजाज (Bajaj) उद्योग समूहाचे अध्यक्ष ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज (Rahul Bajaj) (वय 83) यांचे आज पुण्यात निधन झाले. ते गेले काही दिवस कर्करोगाने आजारी होते. बजाज यांच्या निधनाबद्दल त्यांचेे जवळचे मित्र व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शोक व्यक्त केला आहे. पवार यांनी बजाज यांच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे.

बजाज यांच्या निधनाने जवळचा मित्र गमावला, अशी भावना पवार यांनी ट्विटरवर व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पद्मभूषण राहुल बजाज यांच्या निधनामुळे मला धक्का बसला आहे. स्वातंत्र्यसैनिक जमनालाल बजाज यांचे नातू असलेले राहुल बजाज यांनी समाजातील गरीब आणि मध्यम वर्गात मोठे बदल घडवले. त्यांच्या बजाज बाईक या दुचाकी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अमूलाग्र बदल घडवला.

माझ्या जवळच्या मित्राच्या जाण्याने अतिशय दु:ख झाले. भारताने एक उद्योगपती, दानशूर आणि तरुण स्वयंउद्योजकांना दीपस्तंभाप्रमाणे दिशा दाखवणारे व्यक्तिमत्व गमावले आहे. परवडण्याजोगा दरात वाहने उपलब्ध झाल्यामुळे दळणवळण वाढले. याचबरोब रोजीरोटीसाठी झगडणाऱ्या वर्गाचा संघर्ष सोपा होण्यास मदत झाली. याचबरोबर हे सामाजिक-आर्थिक बदलाचे साधन बनले. त्यांनी उद्योगात दिलेल्या प्रचंड योगदानामुळे आपण सर्व भारतीय त्यांचे ऋणी आहोत. हमारा बजाज!

राहुल बजाज यांच्या मागे बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज आणि बजाज फिन सर्व्हिसेसचे संजीव बजाज अशी दोन मुले आहेत. त्यांची मुलगी सुनयना हिचा विवाह मनीष केजरीवाल यांच्याशी झाला आहे. देशातील नामांकित उद्योग समूह म्हणून बजाज समूहाला उंचीवर नेण्यात राहुल यांचा मोठा वाटा होता. 10 जानेवारी 1938 रोजी त्यांचा कोलकता येथे जन्म झाला होता. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती जमनालाल बजाज यांचे ते नातू होत. बजाज ऑटो, बजाज फिन सर्व्हिसेस, बजाज फायनान्स अशा नामांकित कंपन्या या समूहाकडे आहेत.

राहुल बजाज हे 2006-10 या कालावधीत राज्यसभेवर खासदार होते. दूरदर्शी, स्पष्टवक्ते म्हणून त्यांची ख्याती होती. देशात दुचाकी वाहनांच्या क्षेत्रात क्रांती घडविणाऱ्यांत त्यांचा समावेश होता. `हमारा बजाज` म्हणून त्यांनी तयार केलेली टॅगलाईन ही लहानथोरांच्या ओठावर होती. पुण्यावर त्यांचे प्रेम होते. पुण्यातील अनेक संस्थांना, रुग्णालयांना त्यांनी मदत केली होती. औरंगाबाद एमआयडीसी विकसित होण्यात त्यांचा वाटा होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT