Ajit Pawar News
Ajit Pawar News Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : आमचा करंट तुम्ही बघितला नाही; अजितदादांचा बावनकुळेंना इशारा

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : चिंचवडकरांनो, २६ तारखेला एवढ्या जोरानं कमळाचं बटण दाबा की, शरद पवार आणि अजित पवार यांना चारशे चाळीस व्होल्टचा धक्का बसला पाहिजे, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांनी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील पक्षाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचार सभेत काल केले होते.

त्याचा खरपूस समाचार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी घेताना आमचा करंट त्यांनी अजून बघितला नाही, असा सज्जड इशारा बावनकुळेंना आज दिला. चारशे चाळीस व्होल्टचा करंट देऊ, असं म्हणणाऱ्यांच्या घरचा हा करंट आहे का, या शब्दांत अजितदादांनी बावनकुळेंची खिल्ली उडवली.

ते काहीही बोलतात, असे ते म्हणाले. चिंचवडमधील राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचाराच्या पिंपळे निलखे येथील सभेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे माजी नगरसेवक तुषार कामठे तसेच विजया सुतार, विजय सुतार आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

माजी मंत्री राजेश टोपे, शशिकांत शिंदे, चिंचवडचे राष्ट्रवादीचे निरीक्षक आणि मावळचे आमदार सुनील शेळके, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे-पाटील, प्रवक्ते अतुल लोंढे तसेच रविकांत वर्पे, काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ.कैलास कदम, शिवसेनेचे (ठाकरे) शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले आदी यावेळी व्यासपीठावर होते.

कालच्या केंद्रीय निवडणूक आय़ोगाच्या निर्णयावर सडकून टीका करताना ज्यांनी शिवसेना स्थापन केली, त्यांचा मुलगा आणि नातवाकडून ती काढून घेतल्याने महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, असा इशारा अजितदादांनी आय़ोगाला दिला. तोडफोडीतून आलेल्या राज्यातील सरकारवर जनता नाराज असल्याने ते महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजप निवडणुकीत कुठल्याही थराला जाते, असे सांगताना त्यांनी राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीला चिंचवड व कसबापेठचे अत्यवस्थ आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना रुग्णवाहिकेतून नेल्याचा दाखला दिला. त्यांची एक, दोन मते मिळाली नसती, तर काय आकाशपातळ एक झाले असते का, अशी विचारणा त्यांनी केली.

आताही त्यांनी जनाची सोडा, मनाचीही लाज न बाळगता आजारी खासदार गिरीश बापट यांना प्रचारासाठी व्यासपीठावर आणून बसविल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तुमच्यात धमक नसल्यानेच तुम्ही एवढ्या खालच्या स्तराला जाऊ शकता, असा हल्लाबोल त्यांनी भाजपवर केला.

महात्मा गांधी प्रचाराला वरून येणार का अशी विचारणा करणारे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचाही समाचार घेताना काहीही बोलणाऱ्या पाटलांनी पालकमंत्र्यांसारखे वागावं, असा सल्ला त्यांनी दिला. केंद्र, राज्य व महापालिकेत सत्तेत असूनही भाजपला पाण्याचा साधा प्रश्न सोडवता आला नाही, कारण त्यांच्यातच पाणी नाही, असा टोला त्यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT